मुंबई: म्हाडाच्या नाशिक विभागीय मंडळाला नाशिक परिसरासह गंगापूर शिवार, देवळाली शिवार, पाथर्डी शिवार, म्हसरुळ शिवार, नाशिक शिवार व आगर टाकळी शिवार येथील २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत ४७८ घरे विक्रीसाठी मिळाली आहेत. त्यानुसार खासगी विकासकांच्या प्रकल्पातील या घरांची विक्री परवडणाऱ्या दरात सर्वसामान्यांना घरे उपलब्ध करुन देण्यासाठी नाशिक मंडळाने या घरांसाठी सोडतपूर्व प्रक्रिया सुरु केली आहे. गुरुवारी म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या हस्ते या घरांच्या सोडतीसाठीच्या नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रियेस सुरुवात करण्यात आली आहे. ४ आॅक्टोबरपर्यंत इच्छुकांना अनामत रक्कमेसह अर्ज दाखल करता येणार आहे. सोडतीत सहभागी होत १५ लाख ५१ हजार ते २७ लाख १० हजार रुपयांत हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी उपलब्ध करुन घेता येणार आहे.
नाशिकमध्ये २० टक्के योजनेअंतर्गत म्हाडाला उपलब्ध होणारी घरे म्हाडाला देण्यास विकासकांकडून मोठ्या प्रमाणात टाळाटाळ केली जात आहे. ही योजना लागू होऊ नये म्हणून विकासक वेगवेगळ्या शक्कला लढवितानाही दिसतात. असे असले तरी नाशिक मंडळाकडून २० टक्के योजनेतील घरे मिळविण्यासाठी सातत्याने विकासक आणि नाशिक महानगरपालिकेकडे पाठपुरावा केला जात आहे. त्यामुळेच नाशिक मंडळाला महिन्याभरापूर्वी २० टक्के योजनेतील ४७८ घरे उपलब्ध झाली आणि मंडळाने आता या घरांची सोडत काढण्याचा निर्णय घेत गुरुवारपासून नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रिया सुरु केली आहे.
आता ३ आॅक्टोबरच्या रात्री ११.५९ वाजेपर्यंत आॅनलाईन पद्धतीने अनामत रक्कम भरत इच्छुकांना अर्ज दाखल करता येणार आहे. तर ४ आॅक्टोबरच्या रात्री ११.५९ वाजेपर्यंत आरटीजीएस/एनईएफटीद्वारे अनामत रक्कम भरत अर्ज दाखल करता येणार आहे. १७ आॅक्टोबरला दुपारी १२ वाजता पात्र अर्जांची अंतिम यादी म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर केली जाणार आहे.४७८ घरांच्या सोडतपूर्व प्रक्रियेला सुरुवात झाली असली तरी सोडतीचा निकाल केव्हा आणि कुठे जाहिर होणार हे अद्याप नाशिक मंडळाने जाहिर केलेले नाही. सोडतीची तारीख आणि ठिकाण लवकरच जाहिर करण्यात येण्याची शक्यता आहे.
कुठे किती घरे
श्री विठ्ठल टाॅवर्स, देवळाली शिवार नाशिक येथे २२ घरे उपलब्ध असून ३६.४९ ते ३७.१८ चौ. मीटर क्षेत्रफळांच्या घरांची विक्री किंमत १८ लाख ६५ हजार ७५९ रुपये ते २१ लाख ५२ हजार ५७९ रुपये अशी आहे.
लाईफ ३६०, पार्थडी शिवार, नाशिक येथे ६४ घरे उपलब्ध असून ४२.७० ते ४६.०२ चौ. मीटरच्या घरांची विक्री किंमत १९ लाख २८ हजार ३३२ रुपये ते २० लाख ३६ हजार ६४४ रुपये अशी आहे.
राज क्रेस्ट नाशिक शिवार येथे १४ घरे उपलब्ध असून ४४.८४ ते ४६.०१ चौ. मीटरच्या घरांची विक्री किंमत १५ लाख ४९ हजार ०८२ रुपये ते १५ लाख ८६ हजार २४४ रुपये अशी आहे.
ग्लोबल विले, म्हसरुळ शिवार येथे १९६ घरे उपलब्ध असून ३९.५९ ते ४५.८७ चौ. मीटरच्या घरांची विक्री किंमत १८ लाख २८ हजार ५९६ रुपये ते २० लाख ८१ हजार ४२९ रुपये अशी आहे.
आनंदसागर अनेक्स फेज १ आगरटाकळी शिवार येथील १०० घरे उपलब्ध असून ४७.५४ ते ४९.९८ चौ.मीटरच्या या घरांची विक्री किंमत २६ लाख २२ हजार ०३६ रुपये ते २७ लाख १० हजार ०१९ रुपये अशी आहे.
गृहयोग,गंगापूर शिवार येथे ५० घरे उपलब्ध असून ३९.७५ ते ४६.९१ चौ.मीटरच्या घरांची विक्री किंमत १५ लाख ९५ हजार ९८० रुपये ते १८ लाख ५१ हजार ३०० रुपये अशी आहे.
भाविक मिथिला, आगरटाकळी शिवार येथे ३२ घरे उपलब्ध असून ३९.७५ ते ४६.९१ चौ. मीटरच्या घरांची विक्री किंमत १५ लाख ९५ हजार ८९० रुपये १८ लाख ५१ हजार ३०० रुपये अशी आहे.