मुंबई : म्हाडाचे मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळ दक्षिण मुंबईतील कामाठापुरा परिसराचा पुनर्विकास करणार आहे. यासाठी निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून निविदाकारांनी कामाठीपुरा नावावर आक्षेप घेतला आहे. विक्री घटकातील घरांची विक्री करताना नावामुळे विक्रीत अडचणी येण्याची शक्यता व्यक्त करत त्यांनी किमान प्रकल्पाचे नाव बदलावे अशी मागणी म्हाडाकडे केली आहे. या मागणीनुसार म्हाडाने कामाठीपुरा पुनर्विकास प्रकल्पाचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठीचा प्रस्ताव येत्या १५ दिवसांत राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या मान्यतेनंतर नाव निश्चिती करण्यात येणार आहे.

दक्षिण मुंबईतील अंदाजे ३४ एकर जागेवर कामाठीपुरा वसला आहे. कामाठीपुरात ४७५ उपकरप्राप्त इमारती असून उपकरप्राप्त नसलेल्या १६३ इमारतींसह पुनर्बांधणी करण्यात आलेल्या १५ इमारती, तसेच पीएमजीपी इमारती आहेत. तर ५२ इमारती कोसळल्या आहेत. येथे १५ धार्मिकस्थळे असून दोन शाळा, चार सरकारी कार्यालये आणि आठ इतर बांधकामे आहेत. कामाठापुरा येथील ६,०७३ निवासी आणि १,३४२ अनिवासी रहिवासी आहेत. कामाठीपुरातील सर्व इमारती जुन्या असून १९९० नंतर त्यांची दुरवस्था होण्यास सुरुवात झाली.

आता हा इमारती दुरुस्तीच्या पलिकडे गेल्या आहेत. त्यामुळे येथील इमारतींचा पुनर्विकास करणे आवश्यक असून या पुनर्विकासाची जबाबदारी म्हाडाच्या दुरुस्ती मंडळाने घेतली आहे. त्यानुसार या पुनर्विकासासाठी दुरुस्ती मंडळाने निविदा मागविल्या असून या निविदेला दोन कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे. लवकरच आर्थिक निविदा खुल्या करून निविदा अंतिम करण्यात येणार आहे. त्यानंतर शक्य तितक्या लवकर प्रत्यक्ष पुनर्विकासाच्या कामाला सुरुवात करण्याचे नियोजन आहे. आता कामाठीपुरा पुनर्विकास प्रकल्पाचे नाव बदलण्याचा निर्णय म्हाडाने घेतल्याची माहिती म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी दिली.

कामाठीपुरा हा वेश्याव्यवसायासाठी ओळखला जातो. या परिसराच्या पुनर्विकासाचे वारे १९९० मध्ये वाहू लागले. परिणामी, या परिसरातील वेश्याव्यवसायात असलेल्या महिलांची संख्या कमी होण्यास सुरुवात झाली. त्यामुळेच कधी काळी येथे वेश्याव्यवसायातील महिलांचे प्रमाण ४० हजारांहून अधिक होते तिथे आता ५०० च्या दरम्यान आहेत. मात्र तरीही कामाठीपुराची जुनीच ओळख प्रचलित आहे. हीच बाब पुनर्विकासाच्यादरम्यान प्रकर्षाने पुढे आली आहे. निविदाकारांनी या नावावर आक्षेप घेतला आहे. विक्री घटकातील घरे विकताना आम्हाला अडचण येऊ शकते असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. तर प्रकल्पाचे नाव बदलण्याची मागणी केली. त्यानुसार कामाठीपुरा पुनर्विकासाच प्रकल्पाचे नाव बदलण्यात येणार असल्याचे जयस्वाल यांनी सांगितले. परिसराचे नाव कामाठीपुराच राहील, केवळ प्रकल्पाचे नाव बदलण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले. यासंबंधीचा प्रस्ताव पंधरा दिवसात राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठविला जाणार आहे. पण प्रकल्पाचे नाव नेमके काय असणार यासंबंधीची निश्चिती अद्याप झालेली नाही. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर नाव काय द्यायचे यावर विचार करण्यात येणार असून त्यानंतर नाव अंतिम केले जाणार आहे.