मुंबई : अंधेरी पश्चिम येथील सरदार वल्लभभाई पटेल नगरचा पुनर्विकास म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार कन्स्ट्रक्शन अँड डेव्हल्पमेंट एजन्सीची (सी अँड) अर्थात खासगी विकासकाची नियुक्ती करत पुनर्विकास मार्गी लावण्यासंबंधीचा प्रस्ताव मंडळाकडून राज्य सरकारकडे सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावास आता मान्यतेची प्रतीक्षा असून प्रस्तावास मान्यता मिळाल्यानंतर या पुनर्विकासासाठीची निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे. तर या पुनर्विकासातून मुंबई मंडळाला अतिरिक्त घरे मिळणार आहेत.
मुंबई मंडळाकडून मोतीलाल नगरच्या पुनर्विकासासाठी सी अँड डी प्रारूप आणण्यात आहे. पुनर्विकास मार्गी लावण्यासाठी मंडळाकडे पुरेसा निधी नसल्याने सी अँड डी प्रारूप म्हाडाने आता इतरही पुनर्विकास प्रकल्पांसाठी स्वीकारले आहे. त्यानुसार अभ्यूदयनगर, वांद्रे रेक्लमेशन, आदर्शनगर, पीएमजीपी वसाहत, कामाठीपुरासारखे प्रकल्प याच प्रारुपानुसार मार्गी लावले जात आहेत. यात आता आणखी एका पुनर्विकासाची भर पडली आहे, हा प्रकल्प म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल नगर पुनर्विकास.
अधेरीतील तब्बल दोन लाख ९९ हजार चौ. मीटर जागेवर सरदार वल्लभभाई पटेल नगर वसलेले आहे. या वसातीतील अंदाजे २०-२२ हजार चौ. मीटर जागेवरील इमारतीला याआधीच पुनर्विकासासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे ही जागा वगळत उर्वरित वसाहतीचा पुनर्विकास मोतीलालनगरच्या धर्तीवर करण्याचा निर्णय म्हाडाने घेतला. या निर्णयानुसार मुंबई मंडळाकडून यासंबंधीचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून हा प्रस्ताव जुलैमध्ये राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आल्याची माहिती म्हाडातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
पुनर्विकासासाठी उपलब्ध असलेल्या क्षेत्रात ४६७१ सदनिका आहेत. त्यामुळे या पुनर्विकासाअंतर्गत ४६७१ रहिवाशांचे पुनर्वसन केले जाणार आहे. ही ४६७१ घरे २५ चौ. मीटर ते ८० चौ. मीटरपर्यंतची आहेत. त्यामुळे घराच्या मूळ क्षेत्रफळाप्रमाणे नियमानुसार निश्चित अशा क्षेत्रफळाची घरे रहिवाशांना दिली जाणार आहेत. तेव्हा आता मंडळाला या पुनर्विकासाच्या प्रस्तावाच्या मान्यतेची प्रतीक्षा आहे. हा प्रस्ताव मान्य झाल्यास मंडळाकडून निविदा प्रक्रिया राबवित पुनर्विकास मार्गी लावला जाणार आहे. तर लवकरच या प्रस्तावास मान्यता मिळण्याची शक्यता असल्याची माहिती म्हाडातील सूत्रांनी दिली आहे.