मुंबई : म्हाडाच्या पुणे मंडळाच्या अखत्यारितील ५३ दुकानांसह २८ कार्यालयीन गाळ्यांचा ई लिलाव करण्याचा निर्णय पुणे मंडळाने घेतला आहे. त्यानुसार या ई लिलावासाठी नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रियेस सुरुवात करण्यात आली आहे. या प्रक्रियेस २४ जूनपासून सुरुवात झाली असून इच्छुकांना १५ जुलैपर्यंत अर्ज सादर करून ई लिलावात सहभागी होता येणार आहे. या ई लिलावाच्या माध्यमातून इच्छुकांना पुणे, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यांत दुकाने वा कार्यालयासाठी जागा घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

पुणे मंडळाने पुणे, सोलापूर आणि सांगली येथे अनिवासी गाळे बांधले आहेत. या अनिवासी गाळ्यांचा ई लिलाव करण्यासाठी २१ जून रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. तर २४ जून रोजी सकाळी ११ पासून नोंदणी आणि संगणकीय पद्धतीने कागदपत्रे जमा करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. २७ जूनपासून अर्ज करण्याच्या प्रक्रियेस सुरुवात झाली असून इच्छुकांना १५ जुलैपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत. तर १७ जुलै रोजी सकाळी ११ पासून सायंकाळी ५ पर्यंत संगणकीय पद्धतीने बोली लावता येणार असून बोली संपल्यानंतर ई लिलावाचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. मात्र ई लिलावाच्या निकालाची तारीख पुणे मंडळाने जाहीर केलेली नाही. ही तारीख लवकरच जाहीर होईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुण्यातील मौजे म्हाळुंगे येथील २१.४२ चौ. मीटरच्या पाच दुकानांचा ई लिलावात समावेश आहे. तर पिंपरी वाघिरे, शिरुर पुणे, अभय नगर सांगली, एसपीए-१ सोलापूर या ठिकाणच्या दुकानांचा आणि कार्यालयीन गाळ्यांचा समावेश ई लिलावात आहे. या ई लिलावासाठी पुणे मंडळाने निश्चित केलेल्या बोलीपेक्षा सर्वाधिक बोली लावणारा अर्जदार ई लिलावात विजेता ठरणार आहे. तर या ई लिलावातून पुणे मंडळाला चांगला महसूल मिळण्याची अपेक्षा आहे.