मुंबई : प्रभादेवीमधील जुना उड्डाणपूल पाडून त्याजागी नवीन दुमजली उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. नवीन दुमजली उड्डाणपुलामुळे वाहतूक कोंडी कमी होईल, वाहनांची वाहतूक सुरळीत होईल, असा दावा करण्यात येत आहे.

प्रभादेवी उड्डाणपूल ब्रिटिश काळात बांधण्यात आला होता आणि ११२ वर्षांहून अधिक काळ दक्षिण मुंबईच्या वाहतुकीसाठी एक महत्त्वाचा पूल होता. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून, त्याचे पाडकाम लवकरच सुरू होणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडवर (महारेल) प्रभादेवी येथे दुमजली उड्डाणपुलाचे बांधकाम करण्याची जबाबदारी सोपवली आहे.

महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेश कुमार जयस्वाल म्हणाले की, प्रभादेवी येथे मुंबईतील पहिल्या दुमजली रेल्वे पुलाच्या बांधकामाची जबाबदारी आमच्याकडे सोपवण्यात आली आहे. मुंबईतील प्रवाशांना नावीन्यपूर्ण, सुरक्षितता आणि कार्यक्षमता यांचे मिश्रण करणारे अत्याधुनिक उपाय देण्यासाठी महारेल वचनबद्ध आहे.

प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये

दुमजली रचना – प्रभादेवीचा उड्डाणपूल एकाच वेळी मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या मार्गिका ओलांडून तयार केला जाईल.

एकूण लांबी – १३२ मीटर

पुलाचा खालील भाग (लोअर डेक) – पदपथासह २ २ मार्गिका, स्थानिक वाहतुकीसाठी पूर्व-पश्चिमेला जोडणे शक्य होईल.
पुलाचा वरील भाग (अप्पर डेक) – शिवडी-वरळी उन्नत मार्गाला जोडणारा २ २ मार्गाचा पूल असेल. या भागावर पदपथ नसेल. या पुलामुळे थेट अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूला ये-जा करणे सोयीचे होईल.

प्रकल्पाचा अंदाजे खर्च – १६७.३५ कोटी रुपये

पूर्णत्वाचा कालावधी: सर्व आवश्यक मंजुरींनंतर, उड्डाणपूल अंदाजे एका वर्षात पूर्ण होणे अपेक्षित आहे.
सुपरस्ट्रक्चर प्रकार: ओपन वेब गर्डर, रेल्वे पूल बांधकामासाठी टिकाऊ पुलाची रचना

सध्याच्या उड्डाणपुलाचे पाडकाम – या प्रकल्पात दोन ८०० मेट्रिक टन क्रेन वापरून सध्याच्या उड्डाणपुलाचे पाडकाम करण्यात येईल. हे काम पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेवरील सेवांमध्ये व्यत्यय न आणता अंमलात आणले जाईल.

प्रभादेवीचा उड्डाणपूल १९१३ मध्ये बांधण्यात आला होता. त्यावेळी खूप कमी लोकसंख्येच्या दृष्टीने या पुलाची रचना करण्यात आली होती. परंतु, आजघडीला या पुरावरून मोठ्या प्रमाणावर रहदारी होत आहे. त्यामुळे वाहतूक कोडीची समस्या उद््भवत आहे. भविष्यात ही समस्या दूर होईल, अशी माहिती महारेलद्वारे देण्यात आली.