उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या कफ परेड परिसरातील निवासी इमारतींमध्ये माकडांच्या टोळीने उच्छाद मांडला आहे. येथील शिवालय, मेकर टॉवर, लव्हली होमी, सायराना इमारतीत राहणारे रहिवासी माकडांच्या उपद्रवामुळे त्रासून गेले आहेत. या माकडांच्या भीतीपोटी रहिवासी घराची दारे-खिडक्या बंद करून बसत आहेत.

माकडांनी सायनारा इमारतीतील रहिवाशांना लक्ष्य केले आहे. घराची खिडकी उघडी दिसली की माकडे आत शिरून फोन, घडय़ाळ अशा महागडय़ा वस्तू लंपास करतात. या माकडांना घराच्या बंद खिडक्या उघडण्याचे तंत्रही अवगत झाले असल्याचे स्थानिक रहिवासी हरेश हातिरमानी यांनी सांगितले.

सायनारा इमारतीत राहत असलेल्या जलपा मर्चन्ट यांच्या घरात घुसून माकडांनी तेथील आंब्यांवर ताव मारला. आंबे खाऊन झाल्यानंतर घरातील वस्तूंची नासधूस करून पोबारा केला. काहींच्या घरातील संगणकाचे भाग माकडांनी पळवून नेले आहेत. घरात एखादी चकाकणारी वस्तू दिसली की ती उचलून माकडे पसार होत असल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे.

सायराना इमारतीतील ११व्या मजल्यावरील एका घरात टेबलावर असलेले सामान व खाण्याचे पदार्थ घेऊन दोन माकडांनी पळ काढला. एका घराच्या बाल्कनीत असलेली कुंडीदेखील उचलून नेण्यात आली. एकाच्या घरात जाणारी दूरध्वनीची तार माकडांनी तोडून ठेवली आहे. गेल्या ७ महिन्यांपासून माकडांचा हा उच्छाद सुरू असल्याने येथील रहिवासी त्रासून गेले आहेत. घरात खाण्याजोगे नाही मिळाले तर माकडे इतर वस्तूंची नासधूस करतात, असे सायनारा इमारतीतील रहिवासी लुसी डिसोजा यांनी सांगितले.

वनविभागात तक्रार

वन्यजीव कायद्यानुसार माकडांना पकडण्यासाठी वन विभागाची मदत घ्यावी लागते. त्या प्रमाणे रहिवाशांनी वन विभागात तक्रार केली आहे. मात्र, तक्रार करूनही माकडांना पकडण्याचे काहीच प्रयत्न झाले नाहीत, असे येथील रहिवाशांनी सांगितले.

[jwplayer KrLDSqeZ-1o30kmL6]