मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने साजरा होत असलेल्या आंतरराष्ट्रीय योगदिनी सत्ताधारी महायुतीमधील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या बहुंताश मंत्र्यांनी शनिवारी पाठ फिरवली होती. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दोन आणि शिवसेना शिंदे गटाचे तीन मंत्री योगदिनात सहभागी झाले होते.
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन मंत्र्यांनी योगदिनात सहभागी होत योग, ध्यानधारणी केली. शिवसेना शिंदे गटाकडून शिक्षणमंत्री दादा भुसे, जलसंधारणमंत्री संजय राठोड आणि सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर हे मंत्री सहभागी झाले होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार आज माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने बारामतीमध्ये होते.. शिवसेना नेत्या शायना एन. सी. यांनी नरिमन पाँइंट येथे आयोजित केलेल्या योग दिनास शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. मात्र स्वत: शिंदे यांनी योग केले नाहीत. योगाचे महत्व मात्र शिंदे यांनी उपस्थितांना विशद केले. ‘रिपाइं’ नेते व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केरळमधील मलप्पुरम येथे योगदिनाच्या कार्यक्रमात सहभागी झआले होते.