मुंबई : प्रचलित प्रवासभाड्यातच वातानुकूलित उपनगरीय सेवा मुंबईकरांना उपलब्ध करून देण्यासाठी २६८ वातानुकूलित गाड्यांची खरेदी, उपराजधानी नागपूरमध्ये नवनगर आणि नवीन रिंग रोड, पुणे ते लोणावळा उपनगरीय रेल्वे मार्गावर तिसरी व चौथी मार्गिका तसेच मुंबईत वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया या मार्गावर भूमिगत मेट्रो अशा प्रकल्पांना मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मंगळवारी मान्यता देण्यात आली.

राज्यातील पायाभूत सुविधांचे जाळे अधिक भक्कम करताना सामान्य प्रवाशांना अधिक दिलासा देणाऱ्या काही महत्वाच्या प्रकल्पांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. मुंबई, नागपूर, पुणे, ठाणे, नवी मुंबई या महानगरांमधील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

२६८ नवीन वातानुकूलित गाड्या

मुंबई उपनगरीय रेल्वे गाड्यातील गर्दीवरुन हैराण झालेले प्रवाशी उनगरीय गाड्यांची संख्या वाढविण्याची मागणी सातत्याने करीत आहेत. काही दिवसांपूर्वी दिवा- मुंब्रा दरम्यान गर्दीमुळे उपगरीय रेल्वेतून पडून चार प्रवाशांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर उपनगरीय गाड्यांचे दरवाजे स्वयंचलित करण्याची घोषणा रेल्वेने केली होती. या निर्णयास प्रवाशांनी विरोध केल्यानंतर आता उपगरीय मार्गावर वातानुलित गाड्यांची संख्या वाढवून प्रशांना सध्याच्या प्रवास भाड्यात वातानुकूलित सेवा देण्याचा निर्णय राज्य आणि केंद्र सरकारने घेतला आहे.

उपनगरीय रेल्वे सेवेत आधुनिकता आणण्यासाठीही मुंबई महानगर प्रदेश विकास योजनेच्या (एमयूटीपी) टप्पा ३ व ३ ए अंतर्गत नवीन २६८ वातानुकुलित गाड्यांची खरेदी करण्यास मंत्रिमंडळ उपसमितीने मान्यता दिली. या गाड्या मेट्रोप्रमाणेच बंद दरवाजाच्या, उच्च दर्जाच्या सोयी-सुविधांनी सज्ज असतील. जुन्या गाड्यांना टप्प्याटप्प्याने हटवून त्याऐवजी या आधुनिक गाड्या प्रवाशांना उपलब्ध करून दिल्या जातील. विशेष म्हणजे तिकीट दरांमध्ये कोणताही बदल होणार नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी आवर्जून सांगितले. केंद्र सरकारच्या मान्यतेनंतर नवीन गाड्यांची खरेदी सुरू होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

नागपूरमध्ये नवनगर

उपराजधानी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नागपूरमध्येही विकासाचे नवे दालन उघडण्यावर भर देण्यात आला आहे.. शहरात नवीन रिंग रोड उभारण्यास तसेच नागपुरात एक नवनगर तयार करण्यास मान्यता देण्यात आली. रिंग रोडमुळे नागपूरमधील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.

पुणे – लोणावळा तिसरी आणि चौथी रेल्वे मार्गिका

पुणे–लोणावळा या उपनगरीय रेल्वे मार्गावर तिसरी व चौथी मार्गिका उभारणीस मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे पुणे-लोणावळा कॉरिडॉर अधिक सक्षम होणार असून त्या परिसरातील औद्योगिक, निवासी व व्यावसायिक विकासाला आवश्यक ती मदत होणार आहे. . तसेच पुणे शहरातील वाढत्या वाहतुकीचा ताण कमी करण्यासही यामुळे मदत होईल. याचबरोबर पुणे मेट्रोच्या टप्पा एक अंतर्गत बालाजीनगर–बिबवेवाडी व स्वारगेट–कात्रज या दोन नवीन स्थानकांना मंजुरी मिळाली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया भूमिगत मेट्रो

मुंबईतील मेट्रोचे जाळे अधिक मजबूत करतांना वडाळा ते गेट वे ऑफ इंडिया दरम्यानच्या सुमारे २४ हजार कोटी रुपये खर्चाच्या मेट्रो मार्गिका-११ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे. आणिक आगार ते गेटवे ऑफ इंडिया दरम्यान १७.५१ किलोमीटर लांबीच्या भूमिगत मार्गावर एकूण १४ स्थानके असतील. त्यामध्ये आणिक आगार हे स्थानक जमीनीवर तर वडाळा आगार, सीडीएस काॅलनी, गणेश नगर, बीपीटी रुग्णालय, शिवडी मेट्रो स्टेशन, हे बंदर, दारुखाना. भायखळा मेट्रो स्टेशन, नागरपाडा जंक्शन, भेंडी बाजार, छत्रपती शिवाजी महाराज मेट्रो स्टेशन, हॉर्निमल सर्कल आणि गेट वे ऑफ इंडिया ही १३ स्थानके भूमिगत असतील. सुमारे २४ हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून, जपानी आंतरराष्ट्रीय सहकार्य संस्थेकडून (जायका) यासाठी निधी उपलब्ध होणार आहे.

मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशन(एमएमआरसीएल) या प्रकल्पाची उभारणी करणार असून या मार्गिकेमुळे मुंबईकरांना वाहतुकीत मोठा दिलासा मिळेल. तसेच बेस्टसोबत संयुक्त विकास प्रकल्पांतर्गत व्यावसायिक कॉम्प्लेक्स उभारला जाणार असून, त्यातून बेस्टला अतिरिक्त उत्पन्न मिळणार आहे. हा प्रकल्प सन २०३१ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असून त्याचा फायदा दररोज ५.८० लाख प्रवाशांना होणार आहे.

मुंबईतील कुलाबा ते सिप्झ भूमिगत मेट्रोचे काम गेली आठ वर्षे सुरू आहे. त्यातून मुंबईकरांना वाहतूक कोंडीचा प्रचंड त्रास सहन करावा लगाला. नवीन प्रकल्पाच्या कामामुळे पूर्व द्रुतगती मार्गावर फ्री वेवरून खाली उतरल्यावर छत्रपती शिवाजी महाराज स्थानकापर्यंत वाहतूक कोंडी होण्याची चिन्हे आहेत.

ठाण ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उन्नत मार्ग

ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यान २५ किलोमीटर लांबीचा उन्नत मार्ग उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे ठाणे, नवी मुंबई आणि मधल्या औद्योगिक क्षेत्रांना वेगवान व समर्पित दळणवळण मार्ग उपलब्ध होणार आहे. या उन्नत मार्गामुळे ठाण्यातून नवी मुंबईतील प्रवास जिकरीचा होणार नाही याची खबरदारी सरकारला घ्यावी लागले. कारण उन्नत मार्गासाठी मध्येच रस्ते खोदून ठेवल्यास वाहनचालकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागू शकतो.