मुंबई : गेल्या वर्षांपासून हवा प्रदूषणाच्या समस्येला मुंबईकर सामोरे जात आहेत. शिवाय, हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी मार्च महिन्यात महापालिकेने नियम केले होते. या समस्येची तीव्रता वाढत जाणार हे मार्च महिन्यापासून महापालिकेला माहीत होते. तरीही, महापालिकेने याबाबत काहीच केले नाही, अशा शब्दांच उच्च न्यायालयाने शुक्रवारी महापालिकेच्या निष्क्रियतेवर ताशेरे ओढले.
हवेच्या प्रदूषणामुळे श्वसनाच्या आजारांनी मुंबईकर त्रस्त झाल्यानंतर म्हणजेच ऑक्टोबरपासून महापालिकेने या नियमांची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली. थोडक्यात, मार्च महिन्यापासून महापालिकेने काहीच केलेले नाही, असे ताशेरेही मुख्य न्यायमूर्ती देवेद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या विशेष खंडपीठाने ओढले.
हेही वाचा >>> ‘प्रदूषणाच्या बाबतीत मुंबईची दिल्ली करु नका’ म्हणत उच्च न्यायालयाने फटाके उडवण्यासंदर्भात दिले ‘हे’ आदेश
हवेच्या खालावत चाललेल्या दर्जाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या फिरत्या पथकांनी आतापर्यंत १६२३ बांधकाम ठिकाणांना भेटी दिल्या असून त्यापैकी १०६५ प्रकल्पांना प्रदूषण नियम आणि मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याप्रकरणी नोटीस बजावण्यात आल्याचे महापालिकेच्या वतीने वरिष्ठ वकील मिलिंद साठय़े यांनी शुक्रवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाला सांगितले. त्यावर, या आकडेवारीवरून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रकल्पांचे प्रमाण अधिक असल्यावर न्यायालयाने बोट ठेवले. तसेच, ही आकडेवारीच हवेच्या प्रदूषणाबाबत महापालिकेकडून जे चित्र दाखवण्याचा प्रयत्न करत करत आहे त्यात तथ्य नसल्याचे किंबहुना हवेचा दर्जा गंभीर पातळीवर असल्याचे दर्शवत असल्याचे टोला न्यायालयाने हाणला.
न्यायालयावर जबाबदारी लादण्याचा प्रयत्न
या समस्येवर तज्ज्ञांच्या समितीची गरज बोलून दाखवताना न्यायालयाने केवळ निवाडे द्यायचे असतात, तर सगळय़ा समस्यांवर उपाययोजना करण्याचे, त्यादृष्टीने आवश्यक ते कायदे करण्याचे, निर्णय घेण्याचे काम हे कार्यकारिणीचे असते, असे न्यायालयाने म्हटले. परंतु, या सगळय़ा बाबी करण्याचे काम न्यायालयावर लादले जात असल्याची टिप्पणीही न्यायालयाने केली.
राडारोडा वाहतुकीवर तूर्त बंदी
बांधकामाच्या ठिकाणी निर्माण होणारा राडारोडा वाहतुकीवरील बंदीही १९ नोव्हेंबपर्यंत कायम ठेवण्याचे न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले. त्यानंतर, हा आदेश कायम ठेवायचा की नाही याचा निर्णय संबंधित महापालिका घेतील, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
फटाके वाजवण्याच्या वेळा पाळा : आयुक्त
दिवाळीमध्ये सायंकाळी ८ ते रात्री १० या कालावधीतच फटाके वाजवण्याच्या आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. या निर्देशांचे सर्व मुंबईकरांनी पालन करावे, तसेच कमीत कमी हवा आणि ध्वनिप्रदूषण करणारे फटाके फोडावेत, असे आवाहन मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इक्बाल सिंह चहल यांनी केले आहे. दीपावलीनिमित्त मुंबईकरांना शुभेच्छा देताना आयुक्तांनी वरील आवाहन केले.