मुंबई : विविध समस्या सोपडविण्यात आलेल्या अपयशाच्या निषेधार्थ राज्यातील ॲप आधारित कॅब, टॅक्सी आणि रिक्षा चालकांनी ९ ऑक्टोबर रोजी बंदची हाक दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लक्ष वेधण्यासाठी एक दिवसीय बंद पुकारण्याचे आवाहन भारतीय गिग कामगार मंचाने केले आहे. या बंदमुळे राज्यातील वाहतूक सेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

राज्य परिवहन विभागाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ॲग्रीगेटर्सवर कठोर कारवाई करण्याची मागणी चालकांनी केली आहे. इंधन आणि देखभाल खर्चात प्रचंड वाढ झाली असून चालकांचे उत्पन्न कमी आहे. त्यामुळे सामाजिक सुरक्षा नाही आणि तक्रारींचे निराकरण करण्यासाठी योग्य व्यवस्था नाही. त्यामुळे ९ ऑक्टोबर रोजी चांगले वेतन, विमा लाभ, पारदर्शक भाडे संरचना आणि ॲप कंपन्यांकडून मनमानीपणे चालकांची खाती निलंबित करणे थांबवावे आदी मागण्या करण्यात येणार आहेत, असे भारतीय गिग कामगार मंचाद्वारे सांगण्यात आले.

शासनाचे दर ओला, उबर, रॅपिडो या तिन्ही कंपन्यांना ॲपवर दाखविण्याच्या सूचना परिवहन आयुक्त कार्यालयाने केली होती. परंतु, या कंपन्यांनी ॲपवर शासनाचे दर लागू केलेले नाहीत. आझाद मैदान येथे १५ जुलै २०२५ रोजी परिवहन विभागाच्या गैरकारभाराविरोधात कॅब, रिक्षा व टॅक्सीचालकांनी उपोषण, बंद, निदर्शने आदी आंदोलने केली. ओला, उबर, रॅपिडो या तिन्ही कंपन्या सरकारी नियम पायदळी तुडवून राज्यात बेकायदेशीरपणे काम करत असून, अनेक गुन्हे दाखल केल्यानंतरही खासगी दुचाकीवरून प्रवासी सेवा सुरू आहे.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ३० सप्टेंबर २०२५ रोजी भेट नाकारल्यामुळे आंदोलकांनी जेलभरो आंदोलन केले व शेकडो आंदोलकांनी स्वतःला अटक करून घेतली. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्र्यांचे सचिव विद्याधर महाले यांनी आंदोलक व परिवहन विभागाचे अधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन तोडगा काढण्याचे निर्देश परिवहन विभागाचे प्रभारी अपर परिवहन आयुक्त भरत कळसकर यांना दिले होते. मात्र अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही, असे भारतीय गिग कामगार मंचचे अध्यक्ष डॉ. केशव क्षीरसागर यांनी सांगितले. राज्याचे परिवहन मंत्र्यांनी रॅपिडो कंपनीकडून घेतलेल्या प्रायोजकत्वामुळे परिवहन विभागातील अधिकाऱ्यांना कंपन्यांसमोर झुकावे लागत आहे, असा आरोप आंदोलकांनी केली.

जुलै महिन्यात संघटनेने पुकारलेल्या बंदला राज्यातील कॅब रिक्षा व टॅक्सी चालकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. १०० टक्के चालक यात सहभागी झाले होते. याची मुंबई विमानतळ प्रशासनाने दखल घेतली होती. प्रवाशांना त्यांच्या प्रवासाचे नियोजन करण्याचा आणि वाहतुकीच्या पर्यायी पद्धतींचा विचार करावा, असे आवाहन छत्रपती शिवाजी महाराज मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रशासनाने केले होते. तर, देशभरातील वित्त विषयाचे तज्ञ ९ ऑक्टोबर २०२५ रोजी मुंबईत येणार आहेत. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदीही मुंबईत येण्याची शक्यता आहे. परिवहन विभागाच्या गलथान कारभाराकडे पंतप्रधानाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलकांनी या दिवशी बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. – डॉ. केशव क्षीरसागर, अध्यक्ष, भारतीय गिग कामगार मंच

ॲप आधारित टॅक्सी सेवा ९ ऑक्टोबर रोजी उपलब्ध न झाल्यास नागरिकांचे प्रचंड हाल होण्याची शक्यता आहे. तसेच सार्वजनिक वाहतूक सेवा आणि पर्यायी वाहनांवर ताण येण्याची चिन्हे आहेत. नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होण्याची शक्यता आहे.