मुंबई : मुंबई महानगरपालिका प्रशासनाने घन कचरा व्यवस्थापन खात्यात खाजगीकरण करण्याचा घाट घातला असून या खाजगीकरणाला कामगार, कर्मचाऱ्यांचा प्रचंड विरोध होत आहे. पालिकेच्या या निर्णयाविरोधात कामगार, कर्मचाऱ्यांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी ११ जून रोजी दुपारी २ वाजता दादर येथील शिवाजी मंदिरात ‘प्रचंड मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे.

महानगरपालिकेतील घन कचरा व्यवस्थापन खात्यात काम करणारे मोटरलोडर कामगार आणि परिवहन खात्यातील कामगारांचे कायमस्वरूपी काम काढून ते कंत्राटदारामार्फत करण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. याबाबतची निविदा १४ मे रोजी काढण्यात आली आहे. कचरा व्यवस्थापन खात्यातील खाजगीकरणाला कामगार, कर्मचाऱ्यांकडून प्रचंड विरोध होत आहे. खाजगीकरणाचा निर्णय मागे घेण्याची मागणी कामगार वर्गातून होऊ लागली आहे. ही निविदा रद्द न झाल्यास सर्व कामगार, कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या संपुष्टात येतील, अशी भीती त्यांना सतावत आहे. तसेच वारसा हक्क (पी.टी. केस) नोकरी देखील धोक्यात येणार आहेत. घनकचरा व्यवस्थापन खात्यातील एरिया बेसच्या नावाखाली संपूर्ण मोटरलोडर आणि परिवहन पालिकेच्या कायमस्वरुपी कामगारांच्या नोकऱ्या हिरावून घेण्याचे धोरण पालिका प्रशासनाने अवलंबिल्याचा आरोप कामगारांकडून केला जात आहे.

घनकचरा विभागातील यांत्रिकीकरणामुळे कामगारांच्या नोकऱ्या संपुष्टात येण्याची दाट शक्यता असल्याचेही कामगारांचे म्हणणे आहे. महानगरपालिकेने काढलेली निविदा रद्द करण्यासाठी, तसेच, खाजगीकरण रोखून कायम नोकऱ्या / वारसा हक्क पध्दत (पी.टी. केस) अबाधित ठेवण्यासाठी कामगार, कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनाची तयारी करण्यासाठी बुधवारी शिवाजी मंदिर येथे सर्व खात्यातील कामगार, कर्मचाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या मेळाव्यात म्युनिसिपल मजदूर युनियन, दि म्युनिसिपल युनियन, म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना, कचरा वाहतूक श्रमिक संघ, मुंबई म्युनिसिपल कामगार संघ, म्युनिसिपल मजदुर संघ आदी संघटनांचे कामगार, कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.