मुंबई : मध्य रेल्वेवरील विविध अभियांत्रिकी व देखभालीचे काम करण्यासाठी रविवारी मेगाब्लाॅक घेतला आहे. या मेगाब्लॉकमुळे मध्य रेल्वेच्या धीम्या मार्गावरील विद्याविहार, कांजूर मार्ग, नाहूर या रेल्वे स्थानकाचा थांबा रद्द करण्यात आला आहे. धीम्या मार्गावरील फलाट उपलब्ध नसल्याने मेगाब्लाॅकमध्ये या तीन रेल्वे स्थानकांवर लोकल थांबा नसेल. पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन ब्लाॅक घेण्यात आला असून रविवारी दिवसकालीन कोणताही ब्लाॅक नाही.
मध्य रेल्वे मुख्य मार्ग
- कुठे : माटुंगा- मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर
- कधी : रविवारी सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत
- परिणाम : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून सकाळी १०.१४ ते दुपारी ३.३२ वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील लोकल माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. या लोकल शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील आणि मुलुंड स्थानकावर डाऊन धीम्या मार्गावर पुन्हा वळवल्या जातील. नियोजित वेळेनुसार १५ मिनिटे उशिराने लोकल इच्छित स्थानकात पोहोचतील. ठाणे येथून सकाळी ११.०७ ते दुपारी ३.५१ वाजेपर्यंत सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील लोकल, मुलुंड येथे अप जलद मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. या लोकल मुलुंड ते माटुंगा दरम्यान मुलुंड, भांडूप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव स्थानकांवर थांबतील. त्यानंतर माटुंगा तेथे पुन्हा अप धीम्या मार्गावरून धावतील आणि निर्धारित स्थानकावर या लोकल नियोजित वेळेपेक्षा सुमारे १५ मिनिटे उशिरा पोहोचतील.
ट्रान्सहार्बर मार्ग
- कुठे : ठाणे ते वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर
- कधी : सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० वाजेपर्यंत
- परिणाम : ब्लॉक काळात ठाणे ते वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान अप व डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल सेवा बंद आहेत. ठाणे येथून सकाळी १०.३५ ते दुपारी ४.०७ वाजेपर्यंत सुटणाऱ्या वाशी/नेरुळ/पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन मार्गावरील लोकल सेवा, पनवेल/नेरुळ/ वाशी येथून सकाळी १०.२५ ते दुपारी ४.०९ वाजेपर्यंत ठाण्याकडे जाणाऱ्या अप मार्गावरील लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.