मुंबई : तिकीटधारक प्रवाशांना सुरक्षित, सुकर व आरामदायक प्रवासाची सुविधा देण्याच्या उद्देशाने मध्य रेल्वेने विनातिकीट प्रवाशांवर कडक कारवाई केली आहे. एप्रिल ते जुलै २०२५ या चार महिन्यांच्या कालावधीत तिकीट तपासणी पथकांनी विनातिकीट, वैध तिकीट नसलेल्या १४.४३ लाख प्रवाशांना पकडले आणि त्यांच्याकडून एकूण ८६.७३ कोटी रुपयांची दंडवसुली केली. तर, जुलै २०२५ आणि जुलै २०२४ च्या तुलनेत मध्य रेल्वेने अनियमित प्रवासाच्या प्रकरणांमध्ये ६२ टक्के वाढ नोंदवली असून दंड वसुलीत १०० टक्के वाढ झाली आहे.

मध्य रेल्वेचे तपासण्या मोहीम कशाप्रकारे आहेत…

मध्य रेल्वेवरील नियमितपणे मेल-एक्स्प्रेस, पॅसेंजर, विशेष रेल्वेगाड्यामध्ये, मुंबई पुणे विभागातील लोकलमधील सर्व विभागांमध्ये व्यापक तिकीट तपासणी मोहीमा राबविण्यात आल्या. जेणेकरून विनातिकीट प्रवासावर नियंत्रण ठेवले जाते. अनधिकृत प्रवासावर नियंत्रण ठेवण्यासाठी, मुख्यालय तसेच सर्व विभागांमध्ये नियमितपणे विविध प्रकारच्या तपासण्या केल्या जातात. त्यात स्थानक तपासणी, अचानक धाड तपासणी (ॲम्बुश तपासणी), किल्लाबंदी तपासणी (फोर्ट्रेस चेक), व्यापक तपासणी आणि मेगा तिकीट तपासणी मोहिमा यांचा समावेश आहे.

रेल्वे मंडळाने दिलेल्या उद्दिष्टे पूर्ण

रेल्वे मंडळाने या कालावधीसाठी निश्चित केलेल्या ८१.४८ कोटींच्या उद्दिष्टाच्या तुलनेत हे उत्पन्न ६.४४ टक्क्यांनी अधिक असून, तिकीट तपासणीमधून मिळालेल्या महसुलामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.

जुलै २०२५ मध्ये किती विनातिकीट प्रवाशांना पकडले…

जुलै २०२५ मध्ये मध्य रेल्वेच्या तिकीट तपासणी पथकांनी वैध तिकिटाशिवाय प्रवास करणाऱ्या ३.०८ लाख प्रवाशांना पकडले. तर जुलै २०२४ मधील १.९१ लाख प्रवाशांच्या तुलनेत हे प्रमाण ६२ टक्के वाढले आहे. जुलै २०२५ मध्ये विनातिकीट वैध तिकीटाशिवाय प्रवास करणाऱ्यांकडून दंड स्वरूप १६ कोटी रुपये वसूल करण्यात आले. जुलै २०२४ मध्ये ७.९७ कोटी रुपयांच्या तुलनेत १०० टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे.

आर्थिक वर्ष २०२५-२६ (एप्रिल ते जुलै २०२५) मध्ये वैध तिकिटाशिवाय प्रवास करणाऱ्या प्रवाशांची विभागवार माहिती आणि त्यांच्याकडून वसूल केलेल्या दंडाची रक्कम

  • मुंबई विभागात ५.७३ लाख प्रकरणांमधून २४.२९ कोटी रुपयांची दंडवसुली
  • भुसावळ विभागात ३.८५ लाख प्रकरणांमधून ३३.४९ कोटी रुपयांची दंडवसुली
  • नागपूर विभागात १.५६ लाख प्रकरणांमधून ९.७६ कोटी रुपयांची दंडवसुली
  • पुणे विभागात १.५२ लाख प्रकरणांमधून ८.४२ कोटी रुपयांची दंडवसुली
  • सोलापूर विभागात ८५ हजार प्रकरणांमधून ४.१८ कोटी रुपयांची दंडवसुली
  • मुख्यालयात ९१ हजार प्रकरणांमधून ६.५८ कोटी रुपयांची दंडवसुली

मध्य रेल्वेचे म्हणणे काय…

विनातिकीट प्रवास रोखण्यासाठी, प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवास अनुभव देण्यासाठी मध्य रेल्वे वचनबद्ध आहे. प्रवाशांनी योग्य आणि वैध तिकीट खरेदी करून सन्मानाने प्रवास करावा, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाद्वारे करण्यात आले.