मुंबई : सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत कार्यकारी आरोग्य अधिकारी यांच्या अधिपत्याखालील विभाग कार्यालयातील शस्त्रक्रियागार सहाय्यक पदे कंत्राटी पध्दतीने भरण्याबाबत मुंबई महानगरपालिकेने जाहिरात प्रसिद्ध केली होती. ही पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यास म्युनिसिपल मजदूर युनियनकडून तीव्र विरोध करण्यात आला होता. या निर्णयामुळे कायम कामगारांवर अन्याय होणार असल्याने ही पदे निवडीने भरण्यात यावी, अशी मागणी केली. त्यानंतर मुंबई महानगरपालिका प्रशासनाने ही जाहिरात संकेतस्थळावरून मागे घेत ही पदे पदोन्नतीने व अंतर्गत निवडीने भरण्याचा निर्णय घेतला.

मुंबई महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयातील शस्त्रक्रियागार विभागामधील सहाय्यक पदे ही कार्यरत शस्त्रक्रिया परिचर यांच्यातून पदोन्नतीने किंवा अंतर्गत निवडीने कक्ष परिचर, आया, हमाल यांच्यामधून भरली जातात. मात्र मुंबई महानगरपालिकेने ही पदे कंत्राटी पध्दतीने भरण्याचा निर्णय घेत त्यासंदर्भातील संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध केली. या निर्णयामुळे सध्या कार्यरत असलेले कायम कामगार, कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार आहे. त्यामुळे ही पदे कंत्राटी पध्दतीने भरण्यास म्युनिसिपल मजदूर युनियनकडून विरोध करण्यात आला होता.

सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत कामगारांची पदोन्नतीची शस्त्रक्रियागार सहाय्यक पदे कंत्राटी पध्दतीने न भरता कार्यरत शस्त्रक्रिया परिचर किंवा अंतर्गत निवडीने भरण्यात यावी यासाठी म्युनिसिपल मजदूर युनियनच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. याची दखल घेत मुंबई महानगरपालिका आयुक्तांनी यासंदर्भात चर्चा केली. या चर्चेमध्ये आयुक्तांनी महापालिका उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) यांना पदोन्नतीची पदे व अंतर्गत निवडीची पदे कंत्राटी पध्दतीने न भरता कायम असलेल्या कर्मचाऱ्यांमधून भरण्याचे निर्देश दिले. त्याप्रमाणे उप कार्यकारी आरोग्य अधिकारी यांना शस्त्रक्रियागार सहाय्यक पद कंत्राटी पध्दतीने भरण्यासंदर्भातील जाहिरात महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरून मागे घेण्याचे निर्देश दिले.

त्यानंतर संबंधित जाहितरात तातडीने संकेतस्थळावरून काढून टाकण्यात आली, तसेच ही पदे कर्मचाऱ्यांमधून फक्त पदोन्नतीने व अंतर्गत निवडीने भरण्याचे मान्य करण्यात आले, अशी माहिती संघटनेचे सहाय्यक सरचिटणीस प्रदीप नारकर यांनी दिली.