मुंबई : कुलाबा पोस्ट ऑफिस येथून शुक्रवारी (दि.१८ जुलै) छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या प्रवाशाची बॅग टॅक्सीत विसरली. याबाबत सीएसएमटी पोलीस ठाण्यात माहिती दिली असता पोलिसांनी तासाभरात टॅक्सी चालकाचा शोध घेऊन प्रवाशाला बॅग सुपूर्द केली. सीएसएमटी पोलीस ठाणे, रेल्वे पोलीस व वाहतूक पोलीस यांच्याकडून टॅक्सी चालकाचा शोध घेण्यात आला.
छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी चैतन्य सतीश सुदामे (वय २७) हे कुलाबा पोस्ट ऑफिस येथून सकाळी साडेसहा वाजता टॅक्सीत बसले होते. सीएसएमटी रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारावर ते टॅक्सीतून उतरले. रेल्वे पकडण्याच्या गडबडीत त्यांची बॅग टॅक्सीत विसरली. रेल्वे स्थानक परिसरात टॅक्सी चालकाचा अर्धा तास शोध घेतल्यानंतर सुदामे यांनी सीएसएमटी पोलीस ठाण्याचे अंमलदार आबासाहेब केंगर यांना टॅक्सीत बॅग विसरल्याची माहिती दिली. त्यानंतर अंमलदार केंगर यांनी महिला शिपाई सावंत यांना सीसीटीव्ही कक्षात पाठवले. सीसीटीव्ही कक्षातील रेल्वे पोलीसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले व टॅक्सी चालकाचा वाहन क्रमांक मिळवला.
त्यांनंतर वाहन क्रमांकाच्या साहाय्याने सीएसटी रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक १८ वर असलेल्या वाहतूक पोलिसांनी टॅक्सी चालकाचा मोबाईल नंबर मिळवून त्याच्याशी संपर्क साधला. त्यावेळी टॅक्सी चालक धर्मराज तिवारी (वय ६४) यांनी कुलाबा पोलीस ठाण्यात सकाळी ७.२० वाजता बॅग जमा केल्याची माहिती दिली. कुलाबा पोलीस ठाण्यातील हवालदार चवरे व महिला शिपाई गवई यांनी सहकार्य केले. सीएसएमटी पोलीस ठाण्याचे अंमलदार आबासाहेब केंगर, महिला शिपाई सावंत यांनी सुदामे यांना सकाळी ८.१५ वाजता बॅग सुपूर्द केली.