मुंबई : बीकेसी येथील एका हिरे व्यापाऱ्याचे ९८ लाखांचे हिरे घेऊन हिरे दलाल फरार झाल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी बीकेसी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार विपुलभाई धामी (४७) यांच्या मालकीची ‘धामी एन्टरप्रायझेस’ नावाची हिरे खरेदी – विक्री व्यवहार करणारी कंपनी आहे. कंपनीचे बीकेसी (वांद्रे कुर्ला संकुल) येथे कार्यालय आहे. या कंपनीत अनेक हिरे दलाल हिरे घेण्यासाठी येत असतात. जिग्नेश मेहता त्यांचे नियमित व्यवहार करणारे हिरे दलाल आहेत. मेहता यांनी १६ एप्रिल २०२५ रोजी धामी यांना पलाश एन्टप्रायझेस नावाच्या कंपनीची माहिती दिली. ही कंपनी चांगली असून पलाश कंपनीला चांगल्या प्रतिच्या हिऱ्यांची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसार धामी यांनी पलक मेहता याच्याशी संपर्क साधला. पलक मेहता याने धामी यांच्याकडून ९८ लाख ६० हजार किततीचे ३२८. ६७ कॅरेटचे हिरे विकत घेतले. १५ दिवसात हिऱ्यांचा व्यवहार पूर्ण करून पैसे देण्याचे आश्वासन मेहता यांनी दिली. यावेळी हिरे देताना धामी यांनी रितसर पावती घेतली होती.
मात्र १५ दिवस उलटले तरी पलक मेहता याने हिऱ्यांचे पैसे दिले नाहीत. त्यानंतर त्यांनी टाळाटाळ करण्यास सुरवात केली आणि नंतर त्यांचा फोन बंद झाला. धामी यांनी चौकशी केली असता पलक मेहता याने अनेक जणांची अशा प्रकारे फसवणूक केल्याचे समजले. त्यामुळे धामी यांनी बीकेसी पोलीस ठाण्यात पलक मेहताविरोधात तक्रार दाखल केली. बीकेसी पोलिसांनी पलक मेहताविरोधात फसवणुकीच्या कलम ३१६ (५) आणि ३१८ (४) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.