मुंबई : कर्जवसुलीसाठी दलालांनी केलेल्या तगाद्याला कंटाळून २५ वर्षीय तरूणाने ट्रेनखाली उडी मारून आत्महत्या केली आहे. राहुल विश्वकर्मा असे या तरुणाचे नाव आहे. तो खासगी व्यायामशाळेत प्रशिक्षक म्हणून काम करत होता. आत्महत्येपूर्वी त्याने तीन चित्रफिती तयार करून कुटुंबियांना पाठवल्या होत्या. वडाळा रेल्वे पोलिसांनी याप्रकरणी चार वसुली दलालांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

टिळकनगर आणि चेंबूर स्थानकांदरम्यान गुरूवारी दुपारी एका तरुणाने धावत्या ट्रेनखाली उडी मारून आत्महत्या केली होती. त्याच्या खिशात सापडलेल्या एटीएम कार्डावरून पोलिसांनी त्याची ओळख पटवली. राहुल विश्वकर्मा (२५) धारावी येथील रहिवासी होता. राहुल एका व्यायामशाळेत (जीम) प्रशिक्षक (फिटनेस ट्रेनर) म्हणून काम करीत होता. त्याने आत्महत्येपूर्वी तीन चित्रफिती तयार करून वडील आणि भावाच्या मोबाइलवर पाठवल्या होत्या. ‘मी काही रकमेचे कर्ज घेतले होेते. त्याची परतफेड देखील केली होती. तरी वसुली दलाल (रिक्व्हरी एजंट) माझ्यामागे व्याजाच्या अधिक रकमेसाठी तगादा लावून मला त्रास देत आहेत’, असे त्याने या चित्रफितीत म्हटले होते.

या चित्रफितीत त्याने वसुली दलालांची नावे घेतली आहेत. ‘या दलालांच्या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करीत असून या लोकांना सोडू नका’, असेही त्याने म्हटले होते. या चित्रफिती मिळताच त्याच्या कुटुंबियांनी स्थानिक पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्याचा शोध सुरू असतानाच त्याने आत्महत्या केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या चित्रफितीवरून काही जण त्याला कर्जवसुलीसाठी त्रास देत असल्याचे आढळून आले आहे. आदल्या दिवशी तो जयपूरला प्रेयसीच्या घरी गेला होता. मात्र दलालांनी त्याला बोलावून घेतले होते. त्यामुळे तो नैराश्यात होता, असे वडाळा रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरशु्द्दीन शेख यांनी सांगितले. याप्रकरणी चार वसुली दलालांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विश्वकर्मा याने नेमके किती रुपये कर्ज घेतले होते ते स्पष्ट झालेले नाही.