मुंबई – सायबर पोलीस असल्याची बतावणी करून मलबार हिल येथील व्यावसायिकाकडे पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चौघांविरोधात मलबार हिल पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्यापैकी एक आरोपी तक्रारदाराचा परिचित असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली.

तक्रारदार नेपियन्सी रोड परिसरात वास्तव्यास आहेत. ते व्यावसायिक असून तीन व्यक्तींनी २० जून रोजी संपर्क साधून आपण कसारा सायबर पोलीस ठाण्यातून बोलत असल्याचे त्यांना सांगितले. कसारा येथे अल्पवयीन मुलांकडून मसाज करून घेतल्याप्रकरणी तुमच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून त्याप्रकरणात तुम्हाला अटक होऊ शकते, त्यांनी असे सांगितले. त्यामुळे तक्रारदार घाबरले. त्यांनी आपण काहीच केले नसल्याचे सांगितले. त्यावेळी आरोपींनी त्यांच्याकडे पाच लाख रुपये खंडणीची मागणी केली. अन्यथा त्या प्रकरणात तुम्हाला अटक केली जाईल, असे सांगितले.

तक्रारदारांनी तेवढी रक्कम नसल्याचे सांगितले. अखेर आरोपींनी तक्रारदाराकडून एक लाख रुपये घेतले. त्यानंतरही आरोपींकडून धमकावण्याचा प्रकार सुरूच होता. अखेर तक्रारदाराने याप्रकरणी मलबार हिल पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी याप्रकरणी खंडणी व तोतयागिरी केल्याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला. यापैकी एक आरोपी तक्रारदाराचा परिचित आहे. याप्रकरणी मलबारहिल पोलीस अधिक तपास करीत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एका ३२ वर्षीय आरोपीची ओळख पटली आहे. इतर आरोपी त्याचे साथीदार असल्याचा संशय आहे. याप्रकरणी तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.