मुंबई : राज्यातील काही भागात अधूनमधून हलक्या सरी बरसत आहेत. काही भागात पावसाने उघडीप दिली आहे. विदर्भ तसेच मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे तेथे उन्हाचा ताप वाढला असून संपूर्ण राज्यात पुढील काही दिवस तरी पाऊस पडणार नसल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. त्यामुळे पुढचे काही दिवस तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून पावसाने राज्यात उघडीप दिली आहे. कोकणात तसेच मध्य महाराष्ट्रात अधूनमधून हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी बरसत आहेत. मात्र, विदर्भ आणि मराठवाड्यात मागील अनेक दिवस पाऊस पडलेला नाही. त्यामुळे तेथील तापमानात मागील काही दिवसांपासून वाढ झालेली आहे. गेले तीन ते चार दिवस तेथील तापमान ३१ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक नोंदले जात आहे. राज्यात सोमवारी सर्वाधिक तापमानाची नोंद चंद्रपूर येथे झाली. तेथे ३५ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. त्याचबरोबर अकोला, अमरावती, गोंदिया, वर्धा आणि नागपूर येथेदेखील पारा तीस अंशापार होता. मागील काही दिवसांपासून या ठराविक भागात तापमानाची सर्वाधिक नोंद होत आहे.
पावसाचा जोर वाढणार
मागील आठवडाभर राज्यात पावसाचा जोर कमी होता. त्यामुळे अनेक भागात तापमानात वाढ होऊन उकाडा सहन करावा लागत आहे. दरम्यान, पुढील एक दोन दिवसांत दक्षिण मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर वाढणार आहे. त्यामुळे काही दिवसांनी राज्यात पाऊस पुन्हा सक्रीय होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
मुंबईतही तापमानात वाढ
गेले काही दिवस पावसामुळे मुंबईतील तापमानात घट झाली होती. मात्र, पावसाने उघडीप दिल्याने मुंबईतील तापमानातही वाढ झाली आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात सोमवारी ३१.४ अंश सेल्सिअस तर, सांताक्रूझ केंद्रात ३१.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. याआधी साधारण २७ ते २८ अंश सेल्सिअसपर्यंत तापामान नोंदले जायचे.
पावसाचा अंदाज कुठे?
- मेघगर्जनेसह पाऊस – सांगली, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड , लातूर, धाराशिव, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, यवतमाळ
- हलक्या सरी – मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक घाट परिसर, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा
- पावसाची शक्यता नाही – भंडारा, अमरावती, अकोला, गोंदिया, वाशिम