मुंबई : मुंबईत शनिवारपासून पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. शहर तसेच उपनगरात रविवारी मध्यरात्रीपासून पावसाने जोर धरला आहे. दरम्यान, पुढील काही तासांत मुंबईत पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पुढील काही तास तरी पावसाचा जोर कायम राहणार आहे. या कालावधीत मेघगर्जनेसह पाऊस पडेल.

संपूर्ण राज्यात शनिवारपासून पाऊस सक्रीय झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून ओढ दिलेल्या पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे. दरम्यान, मुंबईतही मागील दोन दिवसांपासून पाऊस पडत आहे. दोन दिवसांच्या तुलनेत रविवारी मध्यरात्रीपासून पावसाने जोर धरला आहे. शहर तसेच उपनगरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. भायखळा, परळ, कुलाबा, अंधेरी, वांद्रे, घाटकोपर, प्रभादेवी या भागात संततधार पाऊस कोसळत आहे. मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, पुढील काही तासांत मुंबईत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

पाऊस पडण्याचे कारण काय?

सध्या विदर्भावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्याचा परिणाम म्हणून प्रामुख्याने कोकण किनारपट्टी विदर्भात काही भागांमध्ये पुढील दोन ते तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही काही ठिकाणी पाऊस होईल, अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यानंतर शुक्रवारपासून राज्यात काही दिवस कोरड्या हवामानाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

रविवारी सकाळी ८:३० ते सोमवारी पहाटे ५:३० पर्यंत झालेला पाऊस

कुलाबा – ८८.२ मिमी

वांद्रे – ८२ मिमी

भायखळा- ७३ मिमी

टाटा पावर – ७०.५

जुहू – ४५ मिमी

सांताक्रूझ- ३६.६ मिमी

महालक्ष्मी – ३६.५

इतर भागातील परिस्थिती

मुंबई बरोबरच राज्यातील इतर भागातही पाऊस सक्रिय झाला आहे. रविवारपासून सर्वत्र पाऊस कोसळत आहे. आजही पुणे घाट परिसर, कोल्हापूर घाट परिसर, सातारा, सांगली तसेच विदर्भात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

पावसाचा परतीचा प्रवास सुरू

नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास अखेर राजस्थानमधून सुरू झाल्याचे भारतीय हवामान विभागाने रविवारी जाहीर केले. पश्चिम राजस्थानच्या काही भागातून मोसमी वाऱ्यांनी माघार घेतली आहे. महाराष्ट्रातून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पाऊस माघारी फिरेल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मोसमी पावसाने २४ मे रोजी केरळमधून भारतात प्रवेश केला होता. त्यानंतर २९ जून रोजी त्याने संपूर्ण देश व्यापला होता.साधारणपणे ८ जुलै रोजी मोसमी वारे संपूर्ण देश व्यापतात. यंदा नऊ दिवस अगोदरच मोसमी वाऱ्यांनी संपूर्ण देश व्यापला त्यानंतरच्या कालावधीत देशात कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला.