मुंबई : नांदेड व त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात सुरू असलेल्या मृत्युसत्राची दखल घेण्याची मागणी बुधवारी एका वकिलाने मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील खंपीठाकडे अर्जाद्वारे केली. न्यायालयानेही त्याची दखल घेऊन वकिलाला याप्रकरणी याचिका दाखल करण्यास सांगितले. आधी नांदेड येथील शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात व त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात मृत्यूसत्र सुरू असल्याचे उघड झाले आहे. शासकीय रुग्णालयातील ढिसाळ कारभार आणि सुविधांचा अभाव यावर मृत्युसत्रामुळे अधोरेखित झाले आहे. न्यायालयानेही या प्रकरणाची स्वतःहून दखल घ्यावी आणि आवश्यक ते आदेश देण्याची मागणी वकील मोहित खन्ना यांनी एका अर्जाद्वारे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाकडे केली. न्यायालयाने या अर्जाची दखल घेऊन खन्ना यांना याप्रकरणी याचिका दाखल करण्यास सांगितले. हेही वाचा : अजित पवार नाराज असल्याने मंत्रीमंडळ बैठकीला गैरहजर असल्याच्या चर्चा, सुनील तटकरे म्हणाले… नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात २४ तासांत २४ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे सोमवारी उघडकीस होते. त्यानंतर आणखी ११ जणांचा मृत्यू झाला होता. तर छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात २४ तासांत १८ जणांचा मृत्यू झाल्याचे मंगळवारी उघड झाले होते.