Mumbai Local Train Service Updates: मुंबईसह दोन्ही उपनगरांत रविवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी भरण्यास सुरुवात झाली. सोमवारी सकाळी पावसाचा जोर कायम असल्याने, याचा फटका रेल्वे सेवेवर झाला. मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील लोकल सेवा विलंबाने धावू लागली आहे. परिणामी, सकाळच्या गर्दीच्यावेळी लोकल उशिराने धावत असल्याने नोकरदार वर्गाला कार्यालयात जाण्यासाठी धावपळ करावी लागत आहे.

मध्य रेल्वेच्या दादर रेल्वे स्थानकादरम्यान आणि पश्चिम रेल्वेवरील वांद्रे स्थानकात पाणी साचल्याने रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने लोकलचा वेग मंदावला. अशा परिस्थितीत प्रवाशांना मोठ्या अडचणींचा तोंड द्यावे लागत आहे. मध्य रेल्वेवरील लोकल वाहतूक १५ ते २० मिनिटे आणि पश्चिम रेल्वेवरील १० ते १५ मिनिटे उशिराने धावत आहे. या कारणामुळे नोकरदार वर्गाला कार्यालयात पोहोचण्यास विलंब होणार आहे.

सेवा खंडीत नाही आतापर्यंत कोणत्याही कारणास्तव मध्य रेल्वेच्या कोणत्याही मार्गावरील लोकल सेवा खंडित झालेली नाही, असे मध्य रेल्वे प्रशासनाद्वारे सांगण्यात आले. तर, काल रात्रीपासून सतत पाऊस पडत असला तरी, मुंबई उपनगरीय विभागांतील पश्चिम रेल्वेच्या लोकल सुरू आहेत, असे पश्चिम रेल्वे प्रशासनाद्वारे सांगण्यात आले.

दृश्यमानता कमी… मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये सोमवारी सकाळपासून पाऊस पडण्यास सुरुवात झाली. दादर, कुर्ला, शीव, घाटकोपर, विक्रोळी, कांजूरमार्ग, वांद्रे, अंधेरी, बोरिवली येथे जोरदार पाऊस पडला. रेल्वे मार्गावरील दृश्यमानता कमी झाल्याने, लोकलचा वेग कमी झाला आहे. त्यामुळे लोकल २५ ते ३० मिनिटे उशिराने धावत आहेत.

लोकलमध्ये गर्दी वाढली मध्य रेल्वेवरून दररोज सुमारे ३५ ते ४० लाख प्रवासी प्रवास करतात. तर, पश्चिम रेल्वेवरून ३० ते ३५ लाख प्रवाशांचा प्रवास होतो. परंतु, पावसामुळे लोकल विलंबाने धावल्याने सकाळी लोकलमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली. भरगच्च लोकलमध्ये प्रवाशांना शिरणे अवघड झाले. त्यामुळे प्रवाशांना लटकून प्रवास करावा लागला. लोकल विलंबाने येत असल्याने, एका लोकलमध्ये दोन ते तीन लोकलमधील प्रवाशांची गर्दी एकत्र होत आहे. परिणामी, काही प्रवाशांनी जीव धोक्यात घालून लोकल प्रवास करावा लागत आहे.

कसारा, टिटवाळा, कर्जत, बदलापूर, कल्याण, ठाणे, पनवेल, वाशी येथून सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या अनेक लोकल नियोजित वेळेच्या २० ते ३० मिनिटे उशिराने धावत आहेत. तसेच डहाणू रोड, विरार, बोरिवली, अंधेरी येथून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या अनेक लोकल नियोजित वेळेच्या १० ते १५ मिनिटे उशिराने धावत आहेत. परिणामी, पश्चिम रेल्वेच्या आणि मध्य रेल्वेच्या मुख्य, हार्बर मार्गावरील महत्त्वाच्या स्थानकात गर्दी झाली आहे.