मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे सीएसएमटीेहून येणाऱ्या आणि जाणाऱ्या लोकल मशीद, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी, करी रोड येथे थांबणार नाहीत. लोकल सीएसएमटीनंतर, भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव, कुर्ल्यापुढे पुन्हा धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. पश्चिम रेल्वेवरील ब्लॉकमुळे विलेपार्ले, राम मंदिर येथे लोकल थांबणार नाहीत.
मध्य रेल्वे
मुख्य मार्ग
कुठे : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावर
कधी : सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ पर्यंत
परिणाम : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.४५ दरम्यान सुटणाऱ्या डाऊन धीम्या लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. या लोकल भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील आणि पुढे विद्याविहार स्थानकावर डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. घाटकोपर येथून सकाळी १०.१९ ते दुपारी ३.५२ पर्यंत सुटणाऱ्या अप धीम्या लोकल विद्याविहार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांवरील थांबतील.
हार्बर मार्ग
कुठे : पनवेल-वाशी अप आणि डाऊन मार्गावर (पोर्ट मार्गिका वगळून)
कधी : सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ पर्यंत
परिणाम : हार्बर मार्गावरील पनवेल येथून सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सोडण्यात येणाऱ्या अप हार्बर मार्गावरील लोकल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ दरम्यान पनवेल / बेलापूर येथे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. पनवेल येथून ठाणे येथे जाणाऱ्या अप ट्रान्स-हार्बर मार्गावरील लोकल सेवा ११.०२ ते दुपारी ३.५३ पर्यंत आणि ठाणे येथून पनवेल येथे जाणाऱ्या डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकल सेवा १०.०१ ते दुपारी ३.२० पर्यंत रद्द राहतील. ब्लॉक काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वाशी विभागावर विशेष लोकल चालवल्या जातील. ब्लॉक काळात ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्स-हार्बर मार्गिकेवरील लोकल उपलब्ध असतील. ब्लॉक काळात पोर्ट मार्गिकेवरील लोकल सेवा उपलब्ध असतील.
पश्चिम रेल्वे
कुठे : सांताक्रूझ – गोरेगाव स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर
कधी : सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत
परिणाम : ब्लॉक कालावधीत सांताक्रूझ – गोरेगाव स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल सेवा जलद मार्गावर वळवण्यात येईल. विलेपार्ले रेल्वे स्थानकाच्या जलद थांबा फलाटाची लांबी अपुरी असल्याने विलेपार्ले येथे लोकल थांबा नसेल. तर, राम मंदिर रेल्वे स्थानकाला जलद फलाट नसल्याने, येथे लोकल थांबणार नाही. हार्बर मार्गावर विलेपार्ले आणि राम मंदिरासाठी लोकल उपलब्ध असतील. या ब्लॉकमुळे, काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत. बोरिवली आणि अंधेरीहून काही लोकल हार्बर मार्गावर गोरेगावपर्यंत धावतील.