मुंबई : सीमा शुल्क (कस्टम) विभागात नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून दोन तरूणांची साडेसहा लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी अंबोली पोलीस ठाण्यात दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पहिली तक्रार अंधेरी येथे वास्तव्यास असलेले सुमित राठोड (४०) यांनी केली होती. राठोड हे खासगी विमान कंपनीत ग्राऊंड स्टाफ म्हणून कार्यरत आहेत. पार्थ पटेल त्यांच्या परिचयाचा असून त्याने सीमा शुल्क (कस्टम) विभागात चांगल्या पगाराची नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन त्यांना दिले. पटेल याने सीमा शुल्क विभागातील दक्षता अधिकारी (व्हिजिलंस ऑफिसर) सुभाषचंद्र यांच्याबरोबर राठोड यांची ओळख करून दिली. ते नोकरी मिळवून देतील. या कामासाठी साडेतीन लाख रूपये लागतील, असे त्याने सांगितले. त्यानुसार राठोड यांनी सुभाषचंद्र यांच्याशी संपर्क साधला. पुढील प्रक्रियेसाठी राठोड यांनी आधार कार्ड, पॅन कार्ड, वीज देयक, शाळेचा दाखला आदी कागदपत्रे सुभाषचंद्र यांच्याकडे दिली.
२९ डिसेंबर २०२३ ते १२ जानेावारी २०२५ या कालावधीत त्याने ३ लाख ७० हजार रुपयेही दिले. मात्र पैसे भरूनही त्यांना नोकरी मिळाली नाही. नोकरी न मिळाल्याने त्यांनी पार्थकडे पैशांची मागणी केली असता त्याने टाळाटाळ केली आणि नंतर संपर्क तोडला. दरम्यान, निखिल मेमाणे यांचीही पार्थ पटेल आणि सुभाषचंद्र यांनी अशाच प्रकारे फसवणूक केल्याचे समजले. निखिल मेमाणे यांनाही सीमा शुल्क विभागातील नोकरीचे आमिष दाखवून २ लाख ७५ हजार रुपये घेण्यात आले होते.
याप्रकरणी सुमित राठोड याने अंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. राठोड आणि निखिल मेमाणे या दोघांची ६ लाख ४५ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपींच्या विरोधात फसवणूक, कट रचणे आदी गुन्ह्यांसाठी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१६ (२), ३१८ (४) आणि ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.