मुंबई : बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीनंतर मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या बँकेची निवडणुकही वादात सापडली आहे. गेल्या आठवड्यात शुक्रवारी रात्री या निवडणूकीची मतमोजणी रात्री उशीरापर्यंत सुरु होती. मध्यरात्री या मतमोजणीवर बहुतांशी उमेदवारांनी आक्षेप घेतला. त्यामुळे मतमोजणी काही काळ थांबवावी लागली होती.
पहाटे या मतमोजणीत भानुदार भोईर यांचे सहकार पॅनेलचे १४ उमेदवार विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले. तर जय सहकार पॅनेलचेही पाच उमेदवार विजयी झाले होते. मात्र जय सहकार पॅनेलने या मतमोजणीवर आक्षेप घेतला असून याप्रकणी काळाचौकी पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली असून न्यायालयात जाण्याचा इशाराही पॅनेल प्रमुखांनी दिला आहे.
मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्याची बँक असलेल्या ‘दि म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड या बँकेची पंचवार्षिक निवडणूक गुरुवारी २१ ऑगस्टला पार पडली. या निवडणूकीसाठी मुंबई महापालिका कामगार व कर्मचारी वर्तुळातील वातावरण गेल्या काही दिवसांपासून तापले होते. बेस्टच्या पतपेढीच्या निवडणूकीनंतर या निवडणूकीलाही महत्त्व आले होते. तब्बल ६० हजाराहून अधिक सभासद असलेल्या या बँकेच्या निवडणूकीला यंदा कामगारांसह अधिकारी वर्गाने चांगला प्रतिसाद दिला.
एकूण ४८ टक्के मतदान झाले होते. यंदाच्या निवडणूकीत प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांचेही पॅनेल या निवडणूकीत उतरले होते. तर तर विद्यामान संचालक मंडळापैकी एक असलेल्या विष्णू घुमरे यांचे एक पॅनेल होते. तर आणखी एक संचालक भानुदास भोईल यांचे एक पॅनेल होते. तर सुप्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या पॅनेलने निवडणूकीआधीच माघार घेतली होती. सदावर्ते यांच्या पॅनेलमधील चार उमेदवारांनी घुमरे यांच्या पॅनेलमधून निवडणूक लढवली होती. या निवडणूकीसाठी विष्णू घुमरे यांचे जय सहकार पॅनेल, भानुदार भोईर यांचे सहकार पॅनेल, बच्चू कडू यांचेजय महाराष्ट्र सहकार पॅनेल, समता पॅनेल, स्वराज्य पॅनेल आणि बीएमसी सहकार पॅनेल अशी सहा पॅनेल होती. मात्र मतमोजणीत बच्चू कडू यांचे पॅनेल मागे पडल्याचे चित्र होते. तर घुमरे याणि भोईर यांच्या पॅनेलमध्येच प्रमुख लढत सुरू असल्याचे चित्र होते.
दरम्यान, शुक्रवारी मध्यरात्री मतमोजणी सुरु असताना अनेक बाबतीत अनियमितता, गैरव्यवहार होत असल्याचा आरोप करीत उमेदवारांनी आक्षेप घेतले होते. मतमोजणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे नोटांची बंडले आढळल्याचेही आरोप यावेळी उमेदवारांनी केले. त्यामुळे प्रचंड गोंधळ झाला व काही काळ मतमोजणीही थांबली होती. तर काही उमेदवारांनी काळाचौकी पोलिस ठाणे गाठले होते. परंतु, मतमोजणी मध्यरात्री सुरू झाली व पहाटे निकाल जाहीर झाला. यामध्ये घुमरे यांच्या पॅनेलचे पाच उमेदवार जिंकून आले. तर बच्चू कडू यांच्या पॅनेलच्या एकाही उमेदवाराचा विजय झाला नाही. तर सदावर्ते यांच्या पॅनेलमधील चारही उमेदवारांना हार पत्करावी लागली. भानुदास भोईर यांच्या पॅनेलचे १४ उमेदवार जिंकून आले आहेत. भोईर हे मुंबई महापालिकेत चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहेत.
या मतमोजणीमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप घुमरे यांनी केला आहे. त्यांनी या प्रकरणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांविरोधात पोलिस तक्रार केली आहे. उमेदवारांच्या आक्षेपांची दखल न घेता निकाल जाहीर करण्यात आल्याचा आरोप घुमरे यांनी केला आहे. मतमोजणी पुन्हा घ्यावी किंवा निवडणूक पुन्हा घ्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. मतमोजणीच्यावेळी अनेक टेबलवर मते वाढवून दिली जात होती. याबाबतचे पुरावेही सादर केले असून उच्चस्तरीय चौकशी करून विनाविलंब न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.