मुंबई : मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागात अनेक परप्रांतीय शिक्षकांनी बनावट जात प्रमाणपत्रांचा आधार घेऊन नोकरी व पदोन्नती मिळवल्याची गंभीर तक्रार पालिकेतील एका शिक्षकाने आझाद मैदान पोलिस ठाण्यात केली आहे. यापूर्वी या शिक्षकाने मुंबई महापालिकेकडे शिक्षकांच्या जातपडताळणी प्रमाणपत्रांची माहिती मागवली होती. मात्र ही माहिती देण्यास मुंबई महापालिका प्रशासन टाळाटाळ करीत असल्यामुळे त्यांनी राज्य माहिती आयुक्तांकडेही हे प्रकरण नेले होते. आता या प्रकरणी तक्रारदार शिक्षकाने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागातील अनेक कर्मचारी व अधिकाऱ्यांनी बनावट जात प्रमाणपत्र सादर करून आरक्षणाचा लाभ मिळवून नोकरी व पदोन्नती मिळाल्याची तक्रार प्रहार शिक्षक संघटनेचे अध्यक्ष विकास घुगे यांनी केली आहे. तसेच काही कर्मचारी व अधिकाऱ्यांनी १००० परप्रांतीय शिक्षकांचे बनावट जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र बनवून त्यांना नोकरी लावली व त्यातून करोडो रुपये कमावल्याचा आरोप घुगे यांनी आपल्या तक्रारीत केला आहे. या प्रकरणी आझाद मैदान पोलिस ठाण्याने पालिका आयुक्तांना पत्र पाठवून माहिती मागवली आहे. या प्रकरणात दखलपात्र गुन्हा निष्पन्न होत असल्यास माहिती द्यावी अशी विनंती पालिका प्रशासनाला करण्यात आली आहे.

बनावट जात प्रमाणपत्र लावल्यामुळे या कर्मचाऱ्यांनी जे लाभ उकळले आहेत त्यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी अपव्ययित झाला असून या कर्मचाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करणे आवश्यक आहे, असे घुगे यांचे म्हणणे आहे. घुगे यांनी यापूर्वी मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाकडे ३७० कर्मचाऱ्यांच्या जात वैधता प्रमाणपत्रांची माहिती मागितली होती. मात्र मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने ही माहिती देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे घुगे यांनी अखेर हे प्रकरण राज्य माहिती आयोगाकडे नेले. आयोगाने या प्रकरणी २३ सप्टेंबर रोजी सुनावणी घेऊन तातडीने माहिती उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले होते. मात्र तरीही पालिका प्रशासन ही माहिती देण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप घुगे यांनी केला आहे. त्यामुळे घुगे यांनी माहिती आयुक्तांकडेही तक्रार केली होती. त्यालाही दाद न दिल्यामुळे आता पोलिस ठाण्यात तक्रार दिली असल्याची माहिती घुगे यांनी दिली.