मुंबई : महानगरपालिकेतर्फे खासगी जागेतील झाडे वगळता अन्य झाडांची छाटणी केली जाते. मात्र, खासगी जागेतील झाडांची छाटणी करण्यात आस्थापना किंवा गृहनिर्माण सोसायट्या लक्ष देत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आता महानगरपालिकेने खासगी जागेतील झाडांचीही छाटणी करण्याचा निर्णय घेतला आहे. खासगी जागेतील बहुतांश झाडे व फांद्या महापालिकेच्या रस्त्यांवर झुकू लागल्या असून त्यामुळे अपघात घडण्याची दाट शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन महानगरपालिकेने खाजगी जागेतील झाडांच्या छाटणीसाठी पुढाकार घेतला आहे.
दरवर्षी पावसाळ्यात झाडे, फांद्या पडून अनेक अपघात घडतात. मुंबईत मोसमी पाऊस दाखल झाल्यापासून आतापर्यंत झाड उन्मळून वा फांदी पडून झालेल्या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहेत. मुंबई महानगरपालिकेने पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून आधीपासूनच वृक्ष छाटणीला सुरुवात केली आहे. मोसमी पाऊस दरवर्षीच्या तुलनेत यंदा वेळेआधीच दाखल झाल्याने युद्धपातळीवर वृक्षछाटणीची कामे केली जात आहेत. खाजगी आस्थापना, गृहनिर्माण संस्था यांच्या हद्दीतील झाडांची जबाबदारी संबंधितांवर असते. खासगी जागेतील वृक्ष छाटणीसाठी ठराविक शुल्काची आकारणी करण्यात येते. मात्र, खाजगी जागेतील बहुतांश झाडांची छाटणी होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. खाजगी जागेतील अनेक झाडे, झाडाच्या फांद्या, झावळ्या रस्ते, पदपथ, वाहतूक बेटे, सार्वजनिक चौक आदींमध्ये झुकत असून त्यामुळे पादचारी व वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे संभाव्य अपघात टाळण्यासाठी महानगरपालिकेने खाजगी जागेतील झाडांची छाटणी करण्याचा निर्णय घेतला आहे. संबंधित पालिका विभाग कार्यालयातील उद्यान खात्याच्या अधिकाऱ्यांमार्फत विभागातील धोकादायक झाडांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
संबंधित झाड मालकास विहित मुदतीत तातडीने झाडाची छाटणी करण्यासंदर्भात लेखी नोटिसा बजावण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. मात्र, दिलेल्या मुदतीत झाडाची छाटणी न झाल्यास उद्यान विभागाच्या प्रचलित धोरणानुसार महापालिकेच्या निधीतून नियुक्त कंत्राटदाराकडून झाडांची छाटणी केली जाईल. संबंधित कार्यवाही सामाजिक जबाबदारी म्हणून करण्यात येत असून या झाडांमुळे भविष्यात दुर्घटना घडल्यास महापालिका जबाबदार नसल्याचे मुंबई महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.