मुंबई : राज्यातील राजकीय परिस्थिती अस्थिर असताना बुधवारी वरिष्ठ पोलीस अधिकारी विवेक फणसाळकर यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. याबाबतचे आदेश गृह विभागाकडून जारी करण्यात आले. मुंबईचे सध्याचे पोलीस आयुक्त संजय पांडे गुरुवारी (ता. ३०) सेवानिवृत्त होत आहेत.

भारतीय पोलीस सेवेच्या १९८९ च्या तुकडीतील अधिकारी असलेले फणसाळकर पोलीस महासंचालक दर्जाचे अधिकारी आहेत. मुंबई पोलीस दलातील ४० हजार पोलिसांचे ते नेतृत्त्व करणार आहेत. ते महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ, मुंबईच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर कार्यरत होते.

फणसाळकर यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाल्यामुळे गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्या रिक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार वरिष्ठ अधिकारी अर्चना त्यागी यांच्याकडे देण्यात आला. 

 १९८६ च्या तुकडीतील पांडे हे निवृत्त झाल्यानंतर सेवाज्येष्ठतेप्रमाणे १९८७ च्या तुकडीतील हेमंत नगराळे हे वरिष्ठ अधिकारी आहेत. मात्र नगराळे यांनी यापूर्वी पोलीस महासंचालक आणि मुंबई पोलीस आयुक्त या दोन्ही पदांवर काम केल्याने त्यांची नियुक्ती अशक्य होती. १९८८ च्या तुकडीतील रजनीश शेठ हे राज्याचे पोलीस महासंचालक आहेत, तर १९८८ च्या तुकडीतील रश्मी शुक्ला या केंद्रात प्रतिनियुक्तीवर आहेत. त्यामुळे या तिघांचाही मुंबई पोलीस आयुक्त पदासाठी विचार करण्यात आलेला नाही, असे गृह विभागातील सूत्राने सांगितले. त्यामुळे १९८९च्या तुकडीतील फणसाळकर यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली असून ते पांडे यांच्याकडून गुरुवारी पदभार स्वीकारतील. गेल्या काही महिन्यांपासून मुंबई पोलिसांवर झालेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर त्यांचे मनोबल वाढवण्याची मोठी जबाबदारी फणसाळकर यांच्यावर आहे.  

कारकिर्दीवर दृष्टिक्षेप.. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फणसाळकर महामंडळापूर्वी ठाण्याच्या पोलीस आयुक्तपदी कार्यरत होते. सुमारे पावणेदोन वर्षे त्यांनी ठाणे शहर आयुक्त पदाचा कार्यभार सांभाळला. त्यांनी मुंबईच्या वाहतूक विभागाचे सहआयुक्त म्हणूनही काम केले होते. सहपोलीस आयुक्त (प्रशासन) या पदाचाही कार्यभार त्यांनी सांभाळला आहे. त्यांची पहिली नियुक्ती अकोल्याचे अतिरिक्त अधीक्षक म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांनी वर्धा व परभणीचे पोलीस अधीक्षक म्हणून काम केले. नाशिकचे उपायुक्त ही त्यांची आयुक्तालयातील पहिली नियुक्ती होती. त्यानंतर दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख म्हणूनही त्यांनी कार्यभार सांभाळला.