मुंबई : प्रवासादरम्यान लोकलच्या दरवाजात लटकताना अनेक प्रवाशांचा पडून किंवा विद्युत खांबाचा जोरदार फटका बसून मृत्यू होतो. जखमी झालेल्या काही प्रवाशांना कायमचे अपंगत्व येते. यावर उपाय म्हणून मुंबई उपनगरीय रेल्वेवर वातानुकूलित लोकल चालविल्या जातात. मात्र, सध्या धावत असलेल्या वातानुकूलित लोकलमध्ये तांत्रिक बिघाड होत असून वातानुकूलित लोकल रद्द करण्याची नामुष्की मध्य रेल्वेवर ओढावली आहे. गुरुवारी मध्य रेल्वेवरील ११ वातानुकूलित लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या.
मध्यम आणि उच्च उत्पन्न गटातील प्रवाशांसाठी वातानुकूलित लोकल खूप लाभदायी ठरली आहे. सकाळी आणि सायंकाळी गर्दी टाळण्यासाठी अनेक प्रवासी वातानुकूलित लोकलला पसंती देत आहेत. त्यामुळे वातानुकूलित लोकलला प्रवाशांचा प्रतिसाद वाढत आहे. तसेच गर्दीची भिती वाटणाऱ्या प्रवाशांसाठी वातानुकूलित लोकल फायदेशीर ठरत आहे. परंतु, मध्य रेल्वेवरील वातानुकूलित लोकलमध्ये वारंवार तांत्रिक बिघाड होत असल्याने प्रवाशांचा खोळंबा होतो. प्रवाशांकडे वातानुकूलित लोकलचा मासिक पास असला तरी त्यांना त्यांच्या इच्छित वातानुकूलित लोकलने प्रवास करता येत नाही. त्यामुळे मध्य रेल्वे विरोधात प्रवाशांनी संताप व्यक्त केला.
प्रवाशांच्या तिकीट, पासाचे पैसे वाया
मध्य रेल्वेच्या ताफ्यात वातानुकूलित लोकलचे ६ रेक होते. यापैकी ५ रेकच्या वातानुकूलित लोकल फेऱ्या धावत होत्या. तर, एका रेकची देखभाल-दुरूस्ती करण्यात येत होती. परंतु, काही महिन्यापूर्वी सातवा रेक मध्य रेल्वेच्या ताफ्यात दाखल झाला. त्यानुसार, मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात ६६ वातानुकूलित लोकल फेऱ्यांमध्ये १४ वातानुकूलित लोकलच्या जादा फेऱ्या समाविष्ट करण्यात आल्या. त्यामुळे दररोज ८० लोकल फेऱ्या धावण्यास सुरुवात झाली.
तर, मध्य रेल्वेच्या ताफ्यात एक पर्यायी रेक उपलब्ध झाल्याने, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत या रेकचा वापर करता येणे शक्य होते. परंतु, वातानुकूलित लोकलच्या फेऱ्या रद्द करून, त्यावेळेत सामान्य लोकल चालविण्यात येतात. यामुळे प्रवाशांना गर्दीमय लोकल प्रवास करावा लागतो. तसेच, तिकीट आणि मासिक पासाचे पैसे वाया जात असल्याची खंत प्रवासी व्यक्त करीत आहेत.
तिकीट, पासाचे पैसे परत करण्याची मागणी
वारंवार वातानुकूलित लोकल रद्द करण्यात येत आहेत. गुरुवारीही वातानुकूलित लोकल रद्द करण्यात आल्याने मासिक पास असलेल्या प्रवाशांना पासाचे पैसे परत द्यावेत किंवा एक दिवस वाढवून द्यावा, अशी मागणी मुंबई रेल प्रवासी संघाने केली आहे.
या वातानुकूलित लोकल फेऱ्यांऐवजी सामान्य लोकल धावल्या…
- सकाळी ९.०३ ठाणे – सीएसएमटी जलद लोकल
- सकाळी ९.५१ सीएसएमटी – अंबरनाथ जलद लोकल
- सकाळी ११.१७ अंबरनाथ – सीएसएमटी धीमी लोकल
- दुपारी १.०६ सीएसएमटी – ठाणे धीमी लोकल
- दुपारी २.२२ ठाणे – सीएसएमटी धीमी लोकल
- दुपारी ३.२४ सीएसएमटी – डोंबिवली धीमी लोकल
- दुपारी ४.५५ डोंबिवली – सीएसएमटी धीमी लोकल
- सायंकाळी ६.१८ सीएसएमटी – डोंबिवली धीमी लोकल
- सायंकाळी ७.५० डोंबिवली – सीएसएमटी धीमी लोकल
- रात्री ९.१६ सीएसएमटी – कल्याण धीमी लोकल
- रात्री १०.५६ कल्याण – कुर्ला धीमी लोकल