Mumbai Police Bribery Arrest / मुंबई – वडाळा टीटी (ट्रक टर्मिनस) पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे आणि उपनिरीक्षक राहुल वाघमोडे यांना शुक्रवारी लाच घेताना मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.
तक्रारदारावर कारवाई न करण्यासाठी या पोलिसांनी साडेपाच लाख रुपयांची लाच मागितली होती. लाचेच्या रकमेतील २ लाखांचा पहिला हप्ता स्विकारतांना ही कारवाई करण्यात आली. गुन्हा दाखल करूनही पुढील कारवाई टाळण्यासाठी लाच मागण्यात आली होती.
तक्रारदार हे सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्याचे एका व्यक्तीशी समाजाचे सभागृह बांधण्यावरून वाद आहेत. त्याच मुद्द्यावरून ७ सप्टेंबर रोजी तक्रारदार आणि त्यांच्या विरुद्ध गटामध्ये वाद झाला होता. त्यावेळी दोन्ही गटाचे लोक वडाळा टी टी पोलीस ठाणे येथे जमा झाले. त्यावेळी विरुद्ध गटाच्या तक्रारीवरून तक्रारदार यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही कारवाई एकतर्फी करण्यात आली होती.
मुलीवर गुन्हा दाखल करेन म्हणून धमकावले
या प्रकरणाचा तपास वडाळा टीटी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक राहुल वाघमोडे (३७) याच्याकडे होता. त्याने तक्रारदारावर गुन्हा दाखल केला होता. पण त्यांच्या मुलीलाही या प्रकऱणात आरोपी करू अशी धमकी दिली. मुलीला आरोपी करायचे नसेल आणि विरूध्द गटातील लोकांविरोधात कारवाई करायची असेल तर लाच द्यावी लागेल असे सांगितले. त्यापैकी ५० हजार स्वत:साठी तर ५ लाख वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांच्यासाठी मागितले. १० सप्टेंबर रोजी लाचेच्या रकमेतील २० हजार रुपये वाघमोडे याने स्विकारले होते.
सापळा लावून पोलीस ठाण्यातच अटक
याबाबत तक्रारदाराने मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकाडे तक्रार केली होती. त्यानुसार शुक्रवारी पोलीस ठाण्यातच सापळा लावण्यात आला होता. शुक्रवारी वाघमोडे याने स्वत:साठी ३० हजार रुपये आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांच्यासाठी २ लाखांचा पहिला हप्ता स्विकारला. त्यावेळी वाघमोडे आणि सरोदे या दोघांना पंचासमक्ष पकडण्यात आले. त्यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही लाचखोर पोलिसांना अटक करण्यात आली आहे.
चंद्रकांत सरोदे यापूर्वी मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील आचोळे आणि मिरा रोड पोलीस ठाण्यात कार्यरत होते. क्षुल्लक प्रकरणातही खोटे गुन्हे दाखल करून लाच मागितली जात असल्याने सर्वसामान्य नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. तर थेट वरिष्ठ पोलीस अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकत असल्याने पोलीस दलातही खळबळ उडाली आहे.
यांच्या पथकाने केली कारवाई
लाचलुचपत प्रतिबंधक विभागााचे अतिरिक्त पोलीस आयुक्त संदीप दिवाण, उपायुक्त अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन थोरात, पर्यवेक्षण अधिकारी कृष्णा मेखली यांच्या पथकाने ही कारवाई केली.