मुंबई : वांद्रे पश्चिम येथील तलावाजवळ कबुतरांना दाणे घालणाऱ्या चौघांविरोधात वांद्रे पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने बंदी केलेली असतानाही कबुतरांना खाद्य टाकण्यात येत असल्याचे आढळल्याने पालिकेच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. कबूतरांना खाद्य टाकल्याप्रकरणी दाखल झालेला हा मुंबईतील चौथा गुन्हा आहे.

मुंबई महापालिकेच्या ‘एच’ पश्चिम प्रभागाचे सहाय्यक उपद्रव शोध पथक गुरूवारी सकाळी वांद्रे (पश्चिम) येथील वांद्रे तलावाजवळ गस्त घालत होते. या पथकात उपद्रक शोध पथक अधिकार योगेश फळके, विजय यादव आणि निलेश जाधव यांचा समावेश होता.

तिघांना दाणे टाकताना हटकले

तीन जण सकाळी साडेअकरा वाजता कबुतरांना दाणे घालत असल्याचे त्यांनी पाहिले. कबुतरांना खाद्य देण्यास न्यायालयाची मनाई आहे असे या पथकाने त्यांना सांगितले. तसेच यासंदर्भात परिसरात लावलेले फलकही दाखवले. याच वेळी आणखी एक महिला आली आणि तिने देखील कबुतरांना दाणे टाकण्यास सुरुवात केली. अधिकाऱ्यांनी तिला थांबवले असता तिने वाद घातला. या पथकाला न जुमानता ती आपल्या दुचाकीवरून निघून गेली.

चौघांविरोधात गुन्हा

पथकाने या तिघांना वांद्रे पोलीस ठाण्यात आणले. सहाय्यक उपद्रव शोध अधिकारी योगेश फळके (४२) यांनी या चौघांविरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी मेहताब शेख (२७), निखिल सरोज (२१) आणि सलाम दुर्गेश कुमार (२२) या तिघांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम २७० (सार्वजनिक उपद्रव), २७१ (जीवघेण्या आजाराचा प्रसार होईल असे निष्काळजीपणाचा कृत्य), २२३ (सार्वजनिक अधिकाऱ्याने काढलेल्या आदेशाचे उल्लंघन) आणि २२१ (सार्वजनिक कार्यात अडथळा आणणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघेही खाजगी कंपन्यांत नोकरीला आहेत. यातील दोन आरोपी वांद्रे येथे, तर एक आरोपी नालासोपारा येथे राहणारा आहे. चौथ्या आरोपी महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही.

मुंबईतील चौथा गुन्हा

कबुतरांना खाद्य देण्याच्या कृतीमुळे सार्वजनिक आरोग्याला आणि स्वच्छतेला धोका निर्माण होत असल्यामुळे कायद्यानुसार गुन्हा दाखल केला जातो. ऑगस्ट २०२५ मध्ये कबुतरांना खाद्य टाकल्याप्रकरणी तीन गुन्हे दाखल करण्यात आले होते. यातील एक गुन्हा डी, तर दोन गुन्हे जी-उत्तर विभाग कार्यालयाच्या हद्दीत दाखल झाले होते. वांद्रे येथे गुरूवारी चौथा गुन्हा दाखल झाला आहे. याशिवाय बृहन्मुंबई महानगरपालिकेने कबुतरांना खाद्य दिल्याबद्दल ६४ नागरिकांना ३२ हजार रुपये दंड केला होता.

कबुतरांमुळे काय त्रास होतो ?

कबूतरांची विष्ठा आणि पिसे यांच्यामुळे अनेक प्रकारचे संसर्गजन्य रोग पसरतात. यामध्ये श्वसनाचे आजार, दमा, आणि इतर फुफ्फुसांशी संबंधित आजारांचा समावेश आहे. लहान मुले, वृद्ध आणि ज्यांना आधीपासूनच श्वसनाचा त्रास आहे, त्यांना यामुळे गंभीर धोका निर्माण होतो. कबुतरांची संख्या वाढल्यामुळे त्यांची विष्ठा सार्वजनिक ठिकाणी, इमारतींवर आणि वाहनांवर जमा होते, त्यामुळे मोठ्या प्रमाणात अस्वच्छता निर्माण होते. ही विष्ठा आम्लयुक्त असते, त्यामुळे इमारती आणि ऐतिहासिक वास्तूंचेही नुकसान होते.

न्यायालयाचे आदेश काय?

मुंबई उच्च न्यायालयाने कबुतरांना खाद्य देणे आरोग्यासाठी धोकादायक असल्याचे घोषित केले आहे. न्यायालयाने पालिकेला अशा व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. या आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येतो. कबुतरांना खाद्य देणाऱ्यांवर ‘सार्वजनिक उपद्रव’, ‘लोकसेवकांनी जारी केलेल्या आदेशाचे उल्लंघन’ आणि ‘रोगराई पसरवण्याची शक्यता असलेला निष्काळजीपणाचा गुन्हा’ यांसारख्या कलमांखाली गुन्हे दाखल केले जातात.