मुंबई : मुंबईत सध्या गणेशोत्सवाची धामधूम सुरू असून अनंत चतुर्दशीच्या दिवशी, शनिवारी गणेश विसर्जन सोहळ्याच्या बंदोबस्तासाठी मुंबई पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे. पोलीस बंदोबस्ताबरोबर यंदा प्रथमच कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करणार आहेत. वाहतूक पोलिसांनीही गर्दीची ५२ ठिकाणे निश्चित केली असून त्यानुसार नियोजन करण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच विसर्जन मिरवणुकांमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था केली आहे.

मुंबईतील ६,५०० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि दीड ते दोन लाख घरगुती गणपतींच्यां विसर्जन मिरवणुका शनिवारी निघणार आहेत. यासाठी पोलिसांनी व्यापक तयारी केली आहे. यासाठी नियमित पोलीस बंदोबस्ताबरोबर यंदा कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर केला जाणार आहे.

असा असेल एआय तंत्रज्ञानाचा वापर

विसर्जन मार्गांवर आणि गर्दीच्या ठिकाणी सुमारे १० हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. ड्रोन कॅमेऱ्यांनीही विसर्जन मिरवणुका आणि गर्दीवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. एआयचा वापर करून या कॅमेऱ्याद्वारे गर्दीचे विश्लेषण व व्यवस्थापन करण्यात येणार आहे. त्यामुळे कोणत्या ठिकाणी काय सुरू आहे त्याची अचूक माहिती पोलिसांना मिळणार आहे. या तंत्रज्ञानामुळे तेथील समस्यांचे जलद निवारण करणे शक्य होणार आहे.

सुरक्षेसाठी व्यापक बंदोबस्त

विसर्जनासाठी शहरात १२ अतिरिक्त पोलीस आयुक्त, ४० उपायुक्त (डीसीपी), ६१ सहायक आयुक्त (एसीपी), तीन हजार अधिकारी आणि १८ हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) १४ तुकड्या, शीघ्र कृती दलाच्या (क्यूआरटी) चार तुकड्या, दंगल नियंत्रण पथकाच्या तीन तुकड्या आणि बॉम्ब शोधक व नाशक पथके (बीडीडीएस) सज्ज ठेवण्यात आली आहेत.

वाहतूक व्यवस्थापनाचे नियोजन

वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठीही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. ४ उपायुक्त आणि २ हजार ८६५ वाहतूक पोलीस कर्मचारी रस्त्यावर असतील. गिरगाव, दादर आणि जुहू चौपाटीसारख्या गर्दीच्या ठिकाणी वाहतुकीत आवश्यक बदल करण्यात आले आहेत. तसेच, ५२ गर्दीची ठिकाणे निश्चित करून वाहतूक नियमनासाठी मनोरे टॉवर उभारण्यात आले आहेत. धोकादायक घोषित केलेल्या १२ पुलांवर विशेष काळजी घेण्याचे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

समुद्रकिनाऱ्यांर ५२० सुरक्षा रक्षक

याव्यतिरिक्त, ५२० सुरक्षा रक्षक समुद्रकिनाऱ्यांवर तैनात करण्यात आले असून, तटरक्षक दलाची (कोस्टगार्ड) मदतही घेतली जात आहे. गर्दीच्या ठिकाणी आवश्यकतेनुसार रुग्णवाहिकांची व्यवस्थाही करण्यात आली आहे. अनुचित प्रकार टाळण्यासाठी साध्या वेशातील पोलीसही तैनात करण्यात आले आहेत. तसेच, पोलिसांच्या परवानगीशिवाय ड्रोन उडवण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.