महाविकास आघाडीने शनिवारी (१७ डिसेंबर) मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून परवानगी देण्यात आल्यानंतर स्थानिक पोलीस ठाण्यात मदतीसाठी अधिकचे संख्याबळ मागवण्यात आले आहे.

जेजे फ्लायओव्हर ते सीएसएमटीपर्यंत निघणाऱ्या मोर्चासाठी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी ३१७ अधिकाऱ्यांसह एकूण १८७० पोलिस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. तसेच राज्य राखीव पोलीस दलाच्या(एसआरपीएफ), २० तुकड्या आणि दंगल नियंत्रण पोलिसांची सुमारे तीन वाहने तैनात करण्यात येणार आहेत.

हेही वाचा >>> मुंबई: मुख्यमंत्र्यांच्या दसरा मेळाव्यादरम्यान आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप; याप्रकरणी जनहित याचिका करा;उच्च न्यायालयाची सूचना

सुरक्षा व्यवस्थेवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी आठ पोलिस उपायुक्त आणि दोन अतिरिक्त पोलिस आयुक्तांना देण्यात आली आहे. भायखळ्याजवळ शुक्रवारी संध्याकाळपासून सर्व सुरक्षा कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले होते. नियंत्रण कक्षातून मोर्चातील हालचालींवर लक्ष ठेवण्यात येणार असून गर्दी लक्षात घेता ड्रोनचाही वापर करण्यात येणार आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याला स्थानिक पातळीवरही सूचना करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा >>> मुंबई: रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक; पश्चिम रेल्वेवर ब्लॉक नाही

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोर्चाला परवानगी देताना पोलिसांनी १३ अटी घातल्या आहेत. त्यात रिचर्डसन्स क्रुडास मिल ते सीएसएमटीपर्यंत मोर्चाची परवानगी देण्यात आली आहे. मोर्चामध्ये कुणीही प्रक्षोभक अथवा कुणाच्याही भावना दुखावतील, असे वक्तव्य करू नये. शस्त्रांचा, प्राण्यांचा वापर करू नये, असेही सांगण्यात आले आहे. कोणत्याही परिस्थितीत कायदा व सुव्यवस्थेस बाधा येणार नाही, याची आयोजकांनी दक्षता घ्यावी. पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, तत्कालीन कायदा व सुव्यस्थेची परिस्थिती पाहून पदयात्रेचा परवाना रद्द करण्याचे अधिकार पोलिसांना आहेत, याची नोंद घ्यावी, अशा अटींचा समावेश आहे.