मुंबई : अनंत चतुर्दशीला शहरातील सर्व मोठ्या गणेश मंडळाच्या गणपतींचे विसर्जन असल्यामुळे मुंबई पोलिसांनी शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. अशा परिस्थितीत मुंबईत काही पाकिस्तानी मच्छीमार आल्याची माहिती देणारा दूरध्वनी मुंबई पोलिसांना आला आहे. तपासणीत दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने खोटी माहिती दिल्याचे निष्पन्न झाले असून आरोपीने यापूर्वीही अशा प्रकारे दूरध्वनी केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
अनंत चतुर्दशीच्या पूर्व संध्येला बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षात एका व्यक्तीने दूरध्वनी केला. पाकिस्तानी मच्छीमार आले असून दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने गोरेगाव पश्चिम येथील सिद्धार्थ नगर येथील पत्ता दिला. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तात्काळ तपासाला सुरूवात केली. गुन्हे शाखा, दहशतवाद विरोधी पथक यांना याबाबत माहिती देण्यात आली. तसेच स्थानिक पोलिसांनाही याबाबतची माहिती देण्यात आली. तपासणीत आरोपीने दिलेली माहिती खोटी असल्याचे निष्पन्न झाले असून यापूर्वी २०२२ मध्येही आरोपीने ११० नियंत्रण कक्षालाही दूरध्वनी केला होता.
गणेशोत्सव निर्विघ्न पार पडावा म्हणून मुंबई पोलिसांनी शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. गणेशोत्सव काळात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी मोठ्या सार्वजनिक गणेश मंडळांसह, विसर्जन स्थळे, गर्दीची ठिकाणे, बाजारपेठा आणि संवेदनशिल ठिकाणी साध्या वेशातील गस्तीसह सीसीटिव्ही कॅमेरे, वॉच टॉवरच्या सहाय्याने करडी नजर ठेवली आहे. ८ अतिरिक्त पोलीस आयुक्त, २५ उपायुक्त, ४५ सहाय्यक पोलीस आयुक्त, १६ हजार २५० पोलीस अंमलदार बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत.
हेही वाचा : मुंबई : आज भरती आणि ओहोटी कधी आहे? जाणून घ्या…
त्यांच्या मदतीसाठी राज्य राखीव पोलीस दलाच्या ३५ प्लाटून तैनात राहणार आहे. याशिवाय १२६ विसर्जन ठिकाणी मेटल डिटेक्टर, श्वान पथक, बाॅम्ब शोधक व नाशक पथकांच्या माध्यमातूनही नियमित तपासणी करण्यात येत आहे. यापूर्वी गणेशोत्सवाच्या काळात मुंबई विमानतळावरील टीटू (टर्मिनल क्रमांक दोन) येथे दूरध्वनी करून विमानतळावर निळ्या रंगाच्या बॅगेत बॉम्ब असल्याचा दूरध्वनी आला होता. आता खोटी माहिती दिल्याप्रकरणी सहार पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पण अशा दूरध्वनीमुळे पोलीस यंत्रणेवर नाहक ताण येतो.