मुंबई : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून मुंबईकरांना त्यांची हरवलेली, चोरी झालेली १९ कोटींची मालमत्ता परत करून त्यांची दिवाळी गोड केली आहे. मागील आठवड्याभरात विविध परिमंडळात चोरीला गेलेला मुद्देमाल परत करण्यासाठी खास कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे तक्रारदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. परत करण्यात आलेल्या मालमत्तामध्ये मोबाईल पासून वाहने, सोन्याचे दागिने आदींचा समावेश आहे.

शहरात वेगवेगळ्या प्रकारची चोरी होत असते. घरफोडी करून सामान चोरले जाते, मोबाईल लंपास केला जातो, रस्त्याने जाताना सोनसाखळी चोरी केली जाते, वाहन चोरी होते, प्रवासात सामानाची चोरी होती. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसतो. मुंबईत अशा चोरींचे प्रमाण वाढत आहे. राष्ट्रीय गुन्हे सांख्यिकी विभागाने (एनसीआरबी) २०२३ चा गुन्हे अहवाल नुकताच प्रकाशित केला. त्यानुसार मुंबईत १ हजार २४३ तर जबरी चोरीचे ३२६ गुन्हे दाखल होते. विविध पोलीस ठाण्यात हे गुन्हे दाखल होते. या गुन्ह्यांचा तपास स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखेकडून केला जात होता.

दिवाळी गोड करण्याची मोहीम

या गुन्ह्यांचा तपास करून दिवाळी सणाच्या वेळी त्यातील जप्त केलेला मुद्देमाल संबंधित तक्रारदारांना परत करण्यात यावा अशी सूचना पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी सर्व पोलिसांना दिली होती. त्यानुसार गुन्ह्यांचा जलदगतीने तपास करण्यात येत होता. त्यानुसार अनेक प्रकरणांचा उलगडा करण्यात आला. आरोपींना पकडून त्यांच्याकडून चोरीला गेलेला ऐवज हस्तगत करण्यात आला. त्या तक्रारदारांना परत करण्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया पार पाडण्यात आली. प्रत्येक परिमंडळात खास कार्यक्रमांचे आयोजन करून त्या मालमत्ता परत करण्यात सुरूवात करण्यात आली.

४ हजार तक्रारदारांना १९ कोटींची मालमत्ता परत

पोलीस सहआयुक्त (कार्यालय व प्रशासन) सत्यनारायण चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेची अंमलबजावणी झाली. गेल्या आठवड्यात एकूण ४ हजार १६९ नागरिकांना त्यांची हरवलेली किंवा चोरी गेलेली मालमत्ता परत करण्यात आली आहे. त्यात मोबाईल, चारचाकी आणि दुचाकी वाहने, सोने-चांदीचे दागिने, लॅपटॉप्स तसेच इतर मौल्यवान वस्तूंचा समावेश होता. हा सर्व ऐवज एकूण १८ कोटी ९८ लाख ५१ हजार १६ इतकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

शहरातील नागरिकांना सुरक्षित वातावरण देण्यास आम्ही प्रयत्नशी आहोत असे पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी सांगितले. मात्र नागरिकांनी देखील काळजी घ्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे. गर्दीच्या ठिकाणी सतर्क राहावे, पोलिसांना सहकार्य करावे, आणि कुठल्याही संशयास्पद वस्तू अथवा व्यक्ती दिसल्यास त्वरित पोलीसांना माहिती द्यावी. आपत्कालीन परिस्थितीत १०० किंवा ११२ या हेल्पलाईन क्रमांकांवर संपर्क साधण्याचेही आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात आले आहे.