मुंबई : पावसाळ्यात रेल्वे रुळांवर झाड किंवा झाडाची फांदी पडून रेल्वे वाहतूक खोळंबा होऊ नये म्हणून मुंबई महापालिकेने रेल्वे रुळांशेजारच्या झाडांच्या फांद्याची छाटणी हाती घेतली आहे. मध्य रेल्वेच्या मेगा ब्लॉक दरम्यान रविवारी मुंबई महापालिकेने दीडेश ते दोनशे झाडांच्या फांद्या छाटण्यात आल्या.

दरवर्षी पावसाळापूर्व कामांचा एक भाग म्हणून धोकादायक ठरू शकणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटणीची कामे मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाकडून सुरू आहेत. ‘महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम, १९७५’ नुसार महानगरपालिका क्षेत्रातील झाडांची सुयोग्यपणे छाटणी केली जाते. पावसाळापूर्व कामांमध्ये प्रामुख्याने मृत आणि धोकादायक झाडांचे निर्मूलन, अनावश्यक फांद्यांची छाटणी, फळे व झावळ्या काढणे, उन्मळून पडलेल्या झाडांची विल्हेवाट लावणे, झाडांचे पुनर्रोपण करणे, झाडांचा तोल सुस्थितीत आणणे व झाडांची मुळे / खोड तसेच पानांवर कीटकनाशकांची फवारणी करणे आदी कामे केली जातात. सार्वजनिक ठिकाणच्या झाडांच्या फांद्याची छाटणी पालिकेमार्फत केली जाते. याचाच एक भाग म्हणून मुंबई महापालिकेने रेल्वे स्थानकाच्या आजूबाजूच्या झाडांच्या फांद्या छाटण्याचे कामही हाती घेतले आहे.

रेल्वे स्थानकाच्या बाजूला असलेल्या झाडांच्या फांद्या वाढल्या की पावसाळ्यात या फांद्या रेल्वे मार्गावर पडण्याचा धोका असतो. फांदी रेल्वेमार्गावर पडल्यास अपघाताचा धोका असतो. तसेच फांदी पडल्यामुळे रेल्वे मार्ग ठप्प होऊ शकतो. पावसाळ्यात अशा दुर्घटना घडतात. त्यामुळे रविवारी मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाने मध्य रेल्वेच्या रेल्वे रुळा लगतच्या झाडांच्या फांद्या छाटण्याचे काम हाती घेतले होते.

रविवारी विद्याविहार ते दिवा स्थानका दरम्यान मध्य रेल्वे प्रशासनामार्फत सहाव्या मार्गिकेवर मेगाब्लाॉक घेतला होता. याच दरम्यान मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाने विद्याविहार विद्याविहार ते मुलुंड पूर्व व पश्चिम बाजूस रेल्वे ट्रॅक जवळ खाजगी व महानगरपालिका हद्दीमध्ये असणाऱ्या वृक्षांची छाटणी करण्याचे काम हाती घेतले होते.

पावसाळ्यात, वादळ वाऱ्यात, रेल्वे ट्रॅक शेजारील वृक्ष उन्मळून पडणे, फांद्या तुटणे यामुळे वाहतुकीवर परिणाम होतो तसेच वृक्ष रेल्वे वर पडून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रेल्वे प्रशासनाच्या कर्मचाऱ्यासोबत विभागातील उद्यान विभागातील अधिकारी यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली होती. त्या आधारे विद्याविहार ते मुलुंड दरम्यान एकूण तीन विभागामध्ये रेल्वे ट्रॅक शेजारील वृक्षांची शास्त्रीय पद्धतीने छाटणी करण्यात आली. या छाटणीकरीता एकूण ४० ते ५० वृक्षछाटणी करणारे कर्मचारी व सुपर वायझर तसेच संबंधित कनिष्ठ वृक्ष अधिकारी प्रत्यक्ष ठिकाणी तैनात करण्यात होते. मध्य रेल्वे प्रशासनातील कर्मचारी यांच्या निगराणी खाली वृक्ष छाटणीचे काम करण्यात आले. रविवारी दिवसभरात दिडशे ते दोनशे झाडांची वृक्ष छाटणी करण्यात आली.