Mumbai News Updates, 16 July 2025 : फेसबुकवर लहान मुलींच्या अश्लील चित्रफिती प्रसारित केल्याप्रकरणी खेरवाडी पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. उत्तराखंडमधील नैनिताल येथे २०२२ मध्ये हे प्रकरण उघडकीस आले होते. यापैकी काही चित्रिफिती या वांद्रे येथून अपलोड केल्याचे आढळल्यानंतर खेरवाडी पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला.
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत पुढील पाच-सहा महिन्यात होण्याची शक्यता असून वेगवेगळ्या पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते विविध पक्षात प्रवेश करत असल्याचे दिसून येत आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला नागपूर शहरात मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे मध्य नागपुरातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते काँग्रेसमध्ये सामील झाले आहेत.
ऑनलाइन प्रवासी सेवा देणाऱ्या कंपन्यांकडून नोंदणी केल्यानंतर भाडे नाकारल्यास वायुवेग पथकाद्वारे कारवाई केली जाते. नोंदणी केल्यानंर भाडे नाकारल्याप्रकरणी १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत एक हजार १५९ ऑटो रिक्षा चालकांवर कारवाई केली असून दोन लाख ५८ हजारांचा दंड वसूल केल्याची माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत दिली.
कल्याणीनगर येथील पोर्शे माेटारीच्या अपघात प्रकरणात संगणक अभियंता तरुण-तरुणीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवालच्या अल्पवयीन मुलाला सज्ञान ठरवून त्याच्याविरुद्ध खटला चालविण्याचा अर्ज बाल न्याय मंडळाने (जेजीबी) मंगळवारी फेटाळला. या निर्णयामुळे अल्पवयीन मुलाला दिलासा मिळाला आहे.
नागपूर, मुंबई, पुणे या शहरांच्या बातम्या जाणून घेण्यासाठी वाचा LIVE BLOG.
[caption id="attachment_5231849" align="alignnone" width="670"] Mumbai Pune Nagpur News Live Updates[/caption]
Pune Mumbai Nagpur Live News Updates in Marathi