IMD Maharashtra Monsoon Update: मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील तीन ते चार तास काही भागांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊसचा कोसळण्याची शक्यता असून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाब क्षेत्राच्या प्रभावामुळे सध्या राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्याचाच परिणाम म्हणून आज अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे मुंबईत पावसाचा जोर वाढू शकतो.

आज समुद्राला मोठी भरती, सुमारे चार मीटरपर्यंत लाटा उसळणार

मुंबईत रविवारी मध्यरात्रीपासून सोमवारी सकाळपर्यंत कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणे जलमय झाली.दरम्यान, आज सकाळी ११.२४ वाजता समुद्राला मोठी भरती येणार आहे. या कालावधीत सुमारे ४.७५ मीटरच्या उंच लाटा उसळणार आहेत. भरतीच्या कालावधीत जोरदार पाऊस झाल्यास मुंबईची वाहतूक सेवा कोलमडण्याची शक्यता आहे. मुंबईत सकाळी ८ ते ९ वाजेपर्यंत शिवडी कोळीवाडा येथे १२ मिमी, गोखले रोड महानगरपालिका शाळा-११ मिमी, चेंबूर कलेक्टर कॉलनी-१३ मिमी, चेंबूर अग्निशमन केंद्र ९ मिमी, नारियलवाडी सांताक्रूझ – २५ मिमी, खार दांडा- २४ मिमी, विलेपार्ले अग्निशमन केंद्र -१५ मिमी, मालवणी अग्निशमन केंद्र – १२ मिमी आणि वर्सोवा उदंचन केंद्र येथे ११ मिमी पावसाची नोंद झाली.

मुंबईत रेड अलर्ट

प्रादेशिक हवामान विभागाने मुंबईसाठी दुपारी १२ वाजेपर्यंत अतिवृष्टीचा (रेड अलर्ट) इशारा दिला आहे. तर ठाणे आणि पालघर भागाला सतर्कतेचा (यलो अलर्ट) इशारा देण्यात आला आहे. या कालावधीत अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यावेळी प्रतितास ५० ते ६० किमी वेगाने वारे वाहतील. तसेच विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल. दरम्यान, मुंबईत रविवारी मध्यरात्रीपासून पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. ग्रॅंन्ट रोड येथील नाना चौकात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.यामुळे कामगार वर्गाला या पाण्यातून मार्ग काढत जावे लागत आहे. संततधार पावसामुळे रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे.

नवी मुंबईतही मुसळधार

नवी मुंबईत रविवारीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. नेरुळ, बेलापूर, खारघर, पनवेल भागात मध्यरात्रीपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. याचबरोबरच वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळत आहे. पहाटेपासून या भागात पावसाचा जोर आणखी वाढला आहे.

विशेषतः सकाळी आणि सायंकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पहाटेपासून अनेक भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. दादर, वरळी, परळ, भायखळा, कुलाबा या भागात मागील साधारण तासाभरापासून जोरदार पाऊस पडत आहे. दरम्यान, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर कर्नाटक परिसरावर असलेले कमी दाबाचे क्षेत्र आता निवळणार आहे. तर पूर्व-मध्य अरबी समुद्रापासून मध्य महाराष्ट्र, उत्तर तेलंगणा, छत्तीसगड ते ओडिशापर्यंत हवेचा कमा दाबाचा पट्टा सक्रिय आहे. बंगालच्या उपसागरात मंगळवारपर्यंत (२७ मे) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत.

तसेच अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र मध्य महाराष्ट्रात आल्याने राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. कोकण आणि मराठवाड्यातही मध्यम ते जोरदार सरींनी हजेरी लावली आहे.

आज पावसाचा अंदाज कुठे ?

अतिमुसळधार पाऊस दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट)

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग , सातारा आणि कोल्हापूर</p>

विजांसह पाऊस सतर्कतेचा इशारा (यलो अलर्ट)

मुंबई, ठाणे, पालघर, अहिल्यानगर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर

मोसमी पाऊस तळकोकणात दाखल

यंदा मोसमी पाऊस अंदाजित वेळेपूर्वीच तळकोकणात दाखल झाला आहे. केरळमध्ये दाखल झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे रविवारी मोसमी पाऊस राज्यात दाखल झाला आहे. रविवारी मोसमी पावसाने तळकोकणातील देवगडमध्ये मुसंडी मारली आहे. अरबी समुद्रातील तीव्र कमी दाब क्षेत्राच्या प्रभावामुळे नैऋत्य मोसमी वाऱ्यांची वाटचाल अधिक वेगात सुरू आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोसमी पाऊस लवकरच मुंबईत…

गेल्या काही वर्षांच्या नोंदींचा आढावा घेता मोसमी पाऊस १० ते १५ जून दरम्यान मुंबईत दाखल होतो. यंदा मात्र राज्यात मोसमी पावसाने लवकर हजेरी लावली आहे. वाऱ्यांच्या पुढील प्रवासासाठीही पोषक वातावरण आहे. त्यामुळे येत्या अगदी दोन – तीन दिवसांत मुंबईतही मोसमी पाऊस दाखल होण्याची शक्यता आहे.