मुंबई : मुंबईत सोमवारी मध्यरात्रीपासून पावसाने जोर धरला असून मंगळवारी सकाळपासूनच जनजीवन विस्कळित होण्यास सुरुवात झाली आहे. अंधेरी भुयारी मार्ग, मानखुर्द भुयारी मार्ग जलमय झाल्याने तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तसेच, दादर टिटी, शीव, अँटॉप हील परिसरात पाणी साचायाला सुरुवात झाली आहे.
गेल्या तीन दिवसांपासून शहर आणि उपनगरांना पावसाने झोडपले. सलग चौथ्या दिवशीही पावसाचा जोर कायम आहे. मुंबईत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे सोमवारी नागरिकांचे प्रचंड हाल झाले. हवामान विभागाने मंगळवारीही मुंबईला अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मंगळवारी पहाटेपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आजही पावसामुळे नागरिकांची कोंडी होण्याची शक्यता आहे.
अंधेरी भुयारी मार्गात पाणी भरल्यामुळे तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तसेच, तेथील वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आली आहे. दक्षिण मुंबईत पायधुनी डीडीजंक्शन, काळबादेवी या भागात सकाळपासून पडत असलेल्या पावसामुळे दीड ते दोन फूट पाणी साचल्याने वाहतूक संत गतीने चालू आहे . दादर टीटी, ट्रॉम्बे, महाराष्ट्र नगर सब वे, अँटॉप हील, एम. जी. आर. चौक, काणेकर नगर, सरदार नगर, प्रतीक्षा नगर या भागात सकाळपासून पडत असलेल्या पावसामुळे दीड ते दोन फुटापर्यंत पाणी साचल्याने वाहतूक संत गतीने सुरू आहे. नागरिकांनी गरज असल्यास घराबाहेर पडावे, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.
अतिमुसळधार पावसासह अधूनमधून ४५ ते ५५ किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
भरती – सकाळी ९,१६ वाजता – ३.७५ मीटर
ओहोटी – दुपारी ३.१६ वाजता – २.२२ मीटर
भरती – रात्री ८.५३ वाजता – ३.१४ मीटर
ओहोटी – मध्यरात्रीनंतर ०३.११ वाजता