मुंबई : अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत स्थापन विशेष न्यायालयाने अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिला १ जून ते १५ सप्टेंबरदरम्यान व्यावसायिक कामांसाठी परदेशात जाण्याची परवानगी दिली आहे. अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूशी संबंधित अमलीपदार्थ प्रकरणात आरोपी असलेल्या रिया हिला चित्रीकरण करण्यासाठी श्रीलंका, सर्बिया आणि विविध युरोपीय देशांमध्ये जायचे आहे.

विशेष न्यायालयाचे न्यायाधीश सी. एस. दातीर यांनी ही परवानगी दिली. रिया ही यापूर्वी देखील न्यायालयाच्या परवानगीने परदेशात प्रवास करत होती आणि तिने जामिनाच्या अटींचे पूर्णपणे पालन केले होते. तिने या अटींचे उल्लंघन केल्याचे एकही उदाहरण नाही, असे न्यायालयाने तिला परदेश प्रवास करण्याची परवानगी देताना नमूद केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुशांत याला अमली पदार्थ खरेदी करून देणे आणि त्यासाठी वित्तपुरवठा करणे या आरोपांतर्गत रिया आणि तिच्या भावाला अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) ८ सप्टेंबर २०२० रोजी अटक केली होती. सुशांत याच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली होती. यामुळे चित्रपट क्षेत्रातील अमली पदार्थ तस्करीची चौकशी सुरू झाली. मुंबई उच्च न्यायालयाने ऑक्टोबर २०२० मध्ये तिला जामीन मंजूर केला.