मुंबई : सोमवारपासून मुंबईतील शाळा सुरु झाल्या. पहिल्याच दिवशी पावसानेही हजेरी लावलेली होती आणि तरीही ढोल ताशांच्या गजरामध्ये सोमवारी सकाळी मुंबईतील विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी अनेक शाळांमध्ये लोकप्रतिनिधी, माजी नगरसेवक, शाळा समिती सदस्यांनी उपस्थिती दर्शवली होती. .
दीड ते दोन महिन्यांच्या प्रदीर्घ सुट्टीनंतर शाळेत न जाण्यासाठी रडणाऱ्या बच्चे कंपनीला घेऊन सोमवारी सकाळपासून भरपावसात पालक छत्री सांभाळत विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन येत होते. शाळेत जाताना रडणारी लहानलहान मुले शाळेच्या प्रवेशद्वारावर येताच फुलांनी सजवलेले प्रवेशद्वार पाहून हरखून गेली. विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारात प्रवेश करताचा त्यांचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहू लागला. सकाळी जोरदार पाऊस पडत असतानाही शाळा प्रशासनांनी विद्यार्थ्यांचे जोरदार स्वागत केले. विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी करून त्यांना गुलाबाचे फुल आणि चॉकलेट देत वर्गामध्ये नेण्यात आले. यावेळी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये लोकप्रतिनिधींमार्फत विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, गणवेश, शालोपयोगी पुस्तकांचे वाटप करण्यात आले. तर खासगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. शिक्षण विभागाने दिलेल्या सूचनेनुसार शाळेमध्ये विद्यार्थ्यांना मधल्या सुट्टीमध्ये विद्यार्थ्यांचे तोंड गोड करण्यासाठी शिरा देण्यात आला होता. तर काही शाळांमध्ये मिठाई वाटण्यात आली. त्यामुळे शाळेचा पहिला दिवस खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांसाठी गोड ठरला.
मुंबईतील खाजगी अनुदानित तसेच विनाअनुदानित अशा तब्बल १ हजार ६५८ शाळा तसेच उपनगरातील २ हजार ४४४ शाळांमध्ये प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला.
शाळेचा पहिला दिवस असल्याने अनेक पालक सुट्टी घेऊन आपल्या पाल्याला शाळेत सोडण्यासाठी आले होते. तसेच नर्सरीमध्ये जाताना रडणाऱ्या बच्चे कंपनीची पालक समजूत घालताना दिसून येत होते. शाळा भरल्यानंतर कुठल्याही पालकांनी थांबू नये अशा सूचना शाळांतील शिक्षक, शिक्षिका देत होत्या तरीही अनेकजण शाळेच्या प्रवेशद्वारावरच शाळेची पहिली घंटा होईपर्यंत रेंगाळत होते. शाळेतील वातावरण पाहून विद्यार्थी भारावून गेले होते. शाळांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांमुळे मुलांनी शाळेचा पहिला दिवस धमाल करत आनंदाने घालवला.
लोकप्रतिनिधींना एकाचवेळी आपल्या परिसरातील सर्व शाळांमध्ये जाणे शक्य नसल्याने त्यांनी काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी हजेरी लावली तर काही शाळांमध्ये ठरावीक वेळानंतर हजेरी लावली. त्यामुळे सकाळच्या सत्राबरोबरच दुपारच्या सत्रामधील विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी लोकप्रतिनिधी उपस्थित राहू शकले. एका शाळेमध्ये किमान एक तास लोकप्रतिनिधी थांबत होते. लोकप्रतिनिधींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.