मुंबईः संरक्षण विभागाच्या जागेवरील सुमारे नऊ हजार झोपड्यांच्या पुनर्वसनावरुन मंगळवारी दोन्ही शिवसेनेच्या आमदारांमध्ये विधानसभेत जोरदार खडाजंगी उडाली. यावेळी झालेल्या गोंधळात चक्क मंत्र्यांनीच अध्यक्षांच्या आसनासमोरील मोकळ्या जागेत धाव घेत गोंधळ घातल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
शिवसेना(ठाकरे) गटाच्या वरुन सरदेसाई यांनी आपल्या मतदार संघातील संरक्षण दलाच्या मालकीच्या सांताक्रुझ गोरीबार येथील जमीनीवरील झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाबाबतची लक्षवेधी मांडली होती. सुमारे ४२ एकरच्या या जागेवर ९ हजार ४८३ झोपड्या असून त्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. ही जागा अतिक्रमणमुक्त करुन त्यातील ५० टक्क जागा संरक्षण विभागास तर ५० टक्के जागेवर झोपड्यांचा पुनर्विकास करण्याबाबतचा प्रस्ताव संरक्षण मंत्रालयास पाठविण्यात आल्याची माहिती प्रभारी गृहनिर्माणमंत्री शंभुराज देसाई यांनी दिली.
त्यावर मंत्री अपूर्ण माहिती देत आहेत. मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेत सविस्तर माहिती दिली असून हा प्रकल्प नेमका कधी मार्गी लागणार अशी विचारणा करीत सरदेसाई यांनी मंत्री देसाई यांच्या उत्तरावर नाराजी व्यक्त केली. त्यामुळे संतापलेल्या देसाई आम्ही या प्रश्नाचा पाठपुरावा करीत आहोत. मात्र तुमचे सरकार असताना काहीही झाले नाही असे वक्तव्य करीत शिवसेना(ठाकरे) गटाला डिवचले. तर आपण कोणत्या अधिकारात उत्तरे देत आहात. आपण उपमुख्यमंत्री कधी झालात अशी विचारणा करीत भास्कर जाधव यांनी शंभूराज देसाई यांना आक्षेप घेतला.
शिवसेनेच्या दोन्ही गटात आरोप-प्रत्यारोपांची खडाजंगी रंगली असतानाच सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी सत्ताधारी सदस्यांना हाताने खुणावत गोंधळ सुरू करण्याचे संकेत दिले. त्यानंतर सत्ताधारी सदस्य गोंधळ घालत अध्यक्षांच्या आसनासमोरील मोकळ्या जागेत धावले. विशेष म्हणजे यात गुलाबराव पाटील, आशिष शेलार, दादा भुसे, राधाकृष्ण विखे पाटील आदी मंत्रीही सहभागी झाले होते. यावेळी झालेल्या गोंधळामुळे तालिका अध्यक्षांनी सभागृहाचे कामाकाज दहा मिनिटांसाठी तहकूब केले.
पुन्हा कामकाज सुरू झाल्यानंतर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या वादावर पडदा टाकताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याकडील विभागांचा कार्यभार अन्य मंत्र्यांकडे दिला असून त्याला आपण मान्यता दिल्याचे सांगितले.