मुंबई : गणेशोत्सवानिमित्त आतापर्यंत ३८० विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला असून त्यापैकी अनेक रेल्वेगाड्या धावण्यास सुरुवात झाली. मध्य रेल्वेने आतापर्यंत ३०६ गणपती विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचे जाहीर केले आहे. त्यात आणखी दोन विशेष रेल्वेगाड्यांची भर पडली आहे. मुंबई ते नागपूर दरम्यान दोन विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत.

गाडी क्रमांक ०११०१ विशेष रेल्वेगाडी २६ ऑगस्ट रोजी रात्री १२.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून निघेल आणि त्याच दिवशी दुपारी ३.५० वाजता नागपूरला पोहोचेल.

गाडी क्रमांक ०११०२ विशेष रेल्वेगाडी २६ ऑगस्ट रोजी दुपारी ४.२० वाजता नागपूरहून निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ८.२५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचेल. या रेल्वेगाडीला दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा येथे थांबा देण्यात येणार आहे.

या रेल्वेगाडीची द्वितीय वातानुकूलित श्रेणीचा एक डबा, तृतीय वातानुकूलित श्रेणीचे दोन डबे, सहा शयनयान डबे, ७ सामान्य द्वितीय श्रेणी डबे, दोन जनरल सेकंड क्लास कम गार्ड ब्रेक व्हॅन अशी संरचना असेल. या रेल्वेगाडीचे आरक्षण सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर करता येणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली.

लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी रोड द्विसाप्ताहिक विशेष रेल्वेगाडी

गाडी क्रमांक ०११३१ द्वैसाप्ताहिक विशेष रेल्वेगाडी प्रत्येक गुरुवारी आणि रविवारी २८ ऑगस्ट, ३१ ऑगस्ट, ४ सप्टेंबर आणि ७ सप्टेंबर रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सकाळी ८.४५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री १०.२० वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल. या रेल्वेगाडीच्या एकूण ४ फेऱ्या चालविण्यात येतील. गाडी क्रमांक ०११३२ द्विसाप्ताहिक विशेष रेल्वेगाडी प्रत्येक गुरुवारी आणि रविवारी २८ ऑगस्ट, ३१ ऑगस्ट, ४ सप्टेंबर आणि ७ सप्टेंबर रोजी सावंतवाडी रोड येथून रात्री ११.२० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १२.३० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. या गाडीच्या एकूण ४ फेऱ्या चालविण्यात येतील.

या रेल्वेगाडीला ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप येथे थांबा देण्यात आला आहे. या रेल्वेगाडीची २ वातानुकूलित तृतीय श्रेणी डबे, १२ शयनयान, ६ सामान्य द्वितीय श्रेणी डबे आणि २ द्वितीय आसन व्यवस्था असलेले गार्ड ब्रेक व्हॅन अशी संरचना असेल.