मार्च महिन्यात ८५ हजार चालकांना दंड; ठिकठिकाणी कॅमेरे

पोलीस नाहीत किंवा रस्ता मोकळा दिसला म्हणून वाहन वेगाने हाकू नका. पकडले जाल. मुंबईकरांच्या डोक्यातली वेगाची नशा उतरवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. शहराच्या प्रमुख किंवा मोकळ्या रस्त्यांवर पोलिसांनी ४७ वाहनांची वेग मर्यादा ओळखणारे ४७ कॅमेरे (स्पीड गन) बसवले आहेत. या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून मार्च महिन्यात ८५ हजारांहून अधिक वाहनचालकांना ई चलन बजावण्यात आले. वेगाच्या नशेपायी वाहनचालकाने स्वत:चा किंवा रस्त्यावरून जाणाऱ्या दुसऱ्या कुणाचा जीव धोक्यात आणू नये, यासाठी ही मोहीम उत्तरोत्तर अधिक तीव्र केली जाईल, असे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले.

स्पीड कॅमेरे आणि अन्य उपलब्ध पर्यायांचा वापर करून मार्च महिन्यात वेग मर्यादा ओलांडणाऱ्या ८५ हजार ४२७ वाहन चालकांना दंड आकारण्यात आला. हे कॅमेरे शहरात मोक्याच्या ठिकाणी म्हणजेच ज्या मार्गाचा वापर दुचाकीस्वार स्पध्रेसाठी करतात किंवा सर्वसामान्यपणे जे रस्ते मोकळे आहेत अशा ठिकाणी बसविण्यात आले आहेत.

रात्र, मध्यरात्रीच्या सुमारास मोकळा रस्ता पाहून वाहनांचा वेग वाढतो. वेगमर्यादा ओलांडली जाते आणि त्यामुळे अपघात घडतात. अपघात रोखण्यासाठी ही मोहीम हाती घेतली असून ती तीव्र केली जाईल, असे वाहतूक शाखेचे सहआयुक्त अमितेश कुमार यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

पश्चिम द्रुतगती मार्ग, वांद्रे बॅण्ड स्टॅण्ड, वांद्रे रेक्लेमेशन, पूर्व द्रुतगती मार्ग, पूर्व मुक्त मार्ग येथे रात्रीच्या वेळेस स्पर्धा आयोजित केल्या जातात. तसेच जीवघेण्या स्टंटची प्रात्यक्षिके दाखवली जातात. पूर्वी वेगमर्यादा जाणून घेण्याची अद्ययावत व्यवस्था नव्हती. त्यामुळे जनजागृतीवर जास्त भर दिला जात होता. नाक्यानाक्यांवर वाहतुकीचे नियमन करण्यासाठी उभ्या वाहतूक पोलिसांकडून बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या चालकांवर दंड आकारला जात होता. मात्र या व्यवस्थेत वेगमर्यादा ओलांडून भरधाव वाहन हाकणाऱ्यांपैकी मोजकेच हाती लागत. स्पीड कॅमेऱ्यांमुळे एकाचवेळी लाखो वाहनांच्या वेगावर परस्पर नजर ठेवणे शक्य होते. त्यामुळेच मार्च महिन्यात ८५ हजारांहून अधिक चलन बजावण्यात आली. वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मरिन ड्राइव्हसह शहरात बहुतांश सर्वच रस्त्यांवर ताशी ६० किलोमिटर प्रति तास ही वेग मर्यादा आहे. तर वांद्रे-वरळी सागरी सेतू, पूर्व मुक्त मार्ग, पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गावर ताशी ८० किलोमीटर प्रतितास अशी वेगमर्यादा आहे.

एमटीपी अ‍ॅपवर ई-चलनची माहिती

वाहतूक पोलिसांनी तयार केलेल्या एमटीपी अ‍ॅपवर (मुंबई ट्राफिक पोलीस अ‍ॅप) वाहनचालकांना आपल्याविरोधात चलन बजावण्यात आले आहे का, कोणता नियमभंग केला, त्याचा दंड किती ही माहिती जाणून घेता येईल, अशी व्यवस्था केली आहे. सहआयुक्त कुमार यांच्या माहितीनुसार अ‍ॅपला ही जोड अलीकडेच देण्यात आली. वाहन नोंदणी क्रमांक टाकून शोधल्यास संबंधित वाहनाविरोधात बजावण्यात आलेल्या चलनाची माहिती, भरलेला दंड, बाकी बसलेला दंड भरणा आदींबाबत माहिती मिळू शकेल. ही माहिती घेऊन वाहनचालकांनी तातडीने दंड भरणा करावा. दंड भरण्यास टाळाटाळ करणारी वाहने नाकाबंदी किंवा अन्य ठिकाणी पकडली गेल्यास तिथल्या तिथे दंड भरून घेतला जाईल. यात वाहनचालकांचा मौल्यवान वेळ फुकट जाईल, असे कुमार यांनी स्पष्ट केले.b