पुनर्मूल्यांकनाची प्रक्रिया लवकरच सुरु करणार, मुंबई विद्यापीठाचे स्पष्टीकरण
मुंबई विद्यापीठाने पदव्युत्तर विधी शाखेच्या द्वितीय सत्र परीक्षेचा निकाल (दोन वर्षीय अभ्यासक्रम) तब्बल ५ महिन्यांनंतर शनिवारी जाहीर केला. परंतु या निकालात असंख्य त्रुटी आढळल्या असून अनेक विद्यार्थी हजर असतानाही त्यांना गैरहजर दाखविण्यात आले आहे. निकालपत्रातून काही विद्यार्थ्यांची नावेच गहाळ झाली असून अनेक विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण दाखविण्यात आले आहे. त्यामुळे पुनर्मूल्यांकनाची प्रक्रिया लवकरच सुरु करून फेरतपासणीचा निकाल जाहीर करावा आणि मगच तिसऱ्या सत्राची परीक्षा घेण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
हेही वाचा >>> सहाय्यक पोलीस निरीक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न




पदव्युत्तर विधी शाखेच्या २०२१-२२ व २०२२-२३ या तुकडीचे शैक्षणिक वर्ष एप्रिल २०२३ मध्ये संपणे अपेक्षित होते. परंतु टाळेबंदीमुळे सदर शैक्षणिक वर्ष विस्कळीत झाले. द्वितीय सत्र परीक्षा ही १० ते १८ जानेवारी या कालावधीत पार पडली आणि तब्बल ५ महिन्यांनंतर विद्यापीठाने शनिवार, २७ मे २०२३ रोजी निकाल जाहीर केला. फेब्रुवारी महिन्यात तात्पुरत्या प्रवेशप्रक्रियेद्वारे द्वितीय वर्षातील तिसरे सत्र सुरु होऊन प्रात्यक्षिक परीक्षा मे महिन्यात झाली. २ विषयांची लेखी परीक्षा ही येत्या जून महिन्यात होण्याची शक्यता आहे. प्रथम व द्वितीय सत्र मिळून एकूण ६ विषयांमध्ये विद्यार्थी जर उत्तीर्ण असेल, तरच तो तृतीय सत्र परिक्षेसाठी पात्र ठरतो. परंतु द्वितीय सत्र परीक्षेत हजर राहूनही गैरहजर दाखविण्यात आल्यामुळे विद्यार्थी चिंतेत आहेत.
हेही वाचा >>> मुंबई: हायड्रोलिक वाहनतळाखाली सापडून तरुणाचा मृत्यू
‘विधी शाखेच्या द्वितीय सत्र परीक्षेची पुनर्मूल्यांकनाची प्रक्रिया तत्काळ सुरु करण्यात यावी आणि फेरतपासणीचा निकाल जाहीर केल्यानंतर किमान १५ दिवसांनी तृतीय सत्र परीक्षा घेण्यात यावी. अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे, याबाबत कुलपती तथा राज्यपाल रमेश बैस आणि मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांना ई-मेलद्वारे पत्र पाठवून सर्व त्रुटी तत्काळ सोडवून विद्यार्थ्यांना दिलासा देण्याची मागणी केली आहे’, असे शिंदे गटाच्या युवा सेनेचे उपसचिव सचिन पवार यांनी सांगितले.
पुनर्मूल्यांकनाची प्रक्रिया लवकरच सुरु
काही महाविद्यालयांनी केलेल्या तांत्रिक चुकांमुळे आणि विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या वेळी उत्तरपत्रिकेवर बारकोड, बैठक क्रमांक, विषय कोड, पेपर कोड अशी वैयक्तिक व विषयासंदर्भातील चुकीची माहिती भरल्यामुळे काही विद्यार्थ्यांचे निकाल हे राखीव ठेवले जातात व विद्यार्थी गैरहजर राहिलेले दिसतात. या सर्व त्रुटी तपासून विद्यार्थ्यांचे निकाल लवकरच जाहीर करण्यात येतील. त्याचबरोबर पुनर्मूल्यांकनाची प्रक्रियाही लवकरच सुरु करण्यात येईल, असे स्पष्टीकरण मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने दिले. ‘आजवर मी विधी शाखेच्या परीक्षेमध्ये कधीच नापास झालो नसून, मला केटी सुद्धा लागली नव्हती. माझा शैक्षणिक रेकॉर्डही चांगला आहे. परंतु पदव्युत्तर विधी शाखेच्या दुसऱ्या सत्राच्या परीक्षेत मला चार पैकी तीन विषयांमध्ये नापास आणि एका विषयात १०० पैकी केवळ ६० गुण दिले आहेत. ५ महिन्यांच्या प्रदीर्घ काळानंतर निकाल जाहीर करूनही असंख्य त्रुटी आढळल्या आहेत. प्राध्यापकांकडून अत्यंत बेजबाबदारपणे उत्तरपत्रिकांची तपासणी करण्यात आली आहे. पुनर्मूल्यांकनाची प्रक्रिया तात्काळ सुरु करून, सुधारित निकाल लवकरच जाहीर करण्यात यावा. अन्यथा अनेक विद्यार्थी तिसऱ्या सत्र परीक्षेस पात्र ठरणार नाही आणि त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाईल’, असे एका विद्यार्थ्याने सांगितले.