मुंबई : मुंबई विद्यापीठ कर्मचारी संघातर्फे (मान्यताप्राप्त) सेवानिवृत्त आणि कार्यरत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी तीव्र आंदोलनास सुरुवात झाली आहे. या आंदोलनाच्या तीन टप्प्यांपैकी पहिल्या टप्प्यात विद्यापीठातील सर्व कार्यरत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या पदनिहाय जबाबदाऱ्या पार पाडत काळ्या रंगाचे बॅच धारण करून शांततामय निषेध नोंदविला. तसेच कलिना संकुलातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे द्वारसभा आयोजित करून दिवंगत १२ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यामध्ये सेवानिवृत्त व कार्यरत कर्मचाऱ्यांसह विविध संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

दरम्यान, आंदोलनाच्या पहिल्या दिवशी मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंनी मुंबई विद्यापीठ कर्मचारी संघाच्या कार्यकारिणीला चर्चेसाठी आमंत्रित केले. या बैठकीस महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघाचे अध्यक्षही उपस्थित होते. याप्रसंगी कुलगुरूंनी ८ ऑक्टोबर २०२५ रोजी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमवेत बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी कुलगुरूंची सकारात्मक भूमिका व पाठपुराव्यासाठी कर्मचाऱ्यांनी आभार मानले. मात्र सकारात्मक निर्णय येईपर्यंत आंदोलन सुरूच राहील, अशी भूमिकाही घेतली. तसेच प्रशासनास या विषयावर त्वरित निर्णय घेण्याचे आवाहन केले. तोपर्यंत आंदोलन शांततेने सुरू राहील, असा निर्धारही व्यक्त केला आहे.

मुंबई विद्यापीठातील शासन अनुदानित एकूण १२७ शिक्षकेत्तर कर्मचारी २०१७ पासून नियत वयोमानानुसार सेवा निवृत्त झाले. यापैकी १२ सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांचे निधन झाले, तर काही शिक्षकेत्तर कर्मचारी आजारी आहेत. सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची सर्व देयके सहा महिन्यांत अदा करण्याचे शासन अध्यादेशात नमूद असतानाही संबंधितांचे निवृत्ती वेतन आणि इतर देणी प्रलंबित आहेत. या अनुषंगाने मुंबई विद्यापीठाकडून संबंधित प्रस्ताव राज्य शासनाकडे वेळोवेळी पाठविण्यात आला आहे.

मात्र शासनाच्या संबंधित विभागाकडून वारंवार नवीन कागदपत्रांची मागणी करून प्रस्ताव परत पाठवण्यात येत आहे. त्यानंतर सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून विद्यापीठाकडून पुन्हा माहिती सादर करण्यात आली आहे. परंतु तरीही हा विषय मार्गी लागलेला नाही. त्यामुळे मुंबई विद्यापीठ कर्मचारी संघाने आंदोलन सुरू केले आहे.