मुंबई : राज्यात एकीकडे वंदे भारत एक्स्प्रेसचे जाळे गुंतवण्यात येत आहे. परंतु, राज्यातील वर्षानुवर्षे धावणाऱ्या रेल्वेगाड्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांचा प्रवास गैरसोयीचा होत आहे. राज्यातंर्गत धावणाऱ्या रेल्वेगाड्या लिंके हाॅफमॅन बुश (एलएचबी) डब्यापासून वंचित आहेत. सरकारचे वंदे भारत वाढवण्याकडे फक्त लक्ष असून इतर रेल्वेगाड्यांना दुर्लक्षित केल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे.

एलएचबी डबे म्हणजे काय?

लिंके हॉफमॅन बुश (एलएचबी) ही एक जर्मन कंपनी असून या कंपनीचे रेल्वे डब्यांची नवीन रचना तयार केली. एलएचबी डबे हे ताशी १६० ते २०० किमी वेगाने धावू शकतात. एलएचबी डबे असलेल्या रेल्वेगाडीचा अपघात झाल्यास, डबे एकमेकांवर चढत नाहीत. त्यामुळे अपघातात मृत्यू व जखमींचे प्रमाण कमी होते. या डब्यांमुळे आरामदायी प्रवास होतो. हे डबे धावताना कमी आवाज करतात. तसेच, डब्यांचा बाहेरील भाग स्टेनलेस स्टीलचा असतो. त्यामुळे डबे अधिक टिकाऊ असतात. यांसह पर्यावरणपूरक बायो-टॉयलेट बसवलेले असतात. या रेल्वे डब्यांच्या सेवेचा कालावधी ३५ वर्षे असतो.

आयसीएफ डबे म्हणजे काय?

चेन्नईस्थित इंटिग्रल कोच फॅक्टरी (आयसीएफ)मधून तयार केलेले डबे हे एलएचबी डब्यांच्या तुलनेत कमी टिकाऊ असतात. या डब्यांच्या रेल्वेगाडीचा अपघात झाल्यास, जास्त जीवितहानी होण्याची शक्यता असते. तसेच, अपघातांत डबे एकमेकांवर चढण्याची शक्यता अधिक असते. हे डबे धावतात, अधिक झटके देते. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास गैरसोयीचा होते. तसेच या रेल्वेगाडीचा कालावधी २५ वर्षांचा असतो. त्यामुळे आयसीएफ डब्यांपेक्षा एलएचबी डबे अधिक उपयुक्त आहेत.

प्रवाशांची मागणी

राज्यातंर्गत धावणाऱ्या रेल्वेगाड्यांना एलएचबी डब्यांत रूपांतरित करण्याची मागणी गेल्या अनेक कालावधीपासून प्रवाशांद्वारे केली जात आहे. परंतु, रेल्वे प्रशासन, रेल्वे मंडळाद्वारे या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे, असा आरोप प्रवाशांनी केला.

एलएचबी डब्यांपासून या रेल्वेगाड्या वंचित

  • गाडी क्रमांक ११००३/११००४ दादर – सावंतवाडी तुतारी एक्स्प्रेस (दोन रेक)
  • गाडी क्रमांक ११०२९/११०३० कोल्हापूर-मुंबई कोयना एक्स्प्रेस आणि गाडी क्रमांक १११३९/१११४९ मुंबई हॉस्पेट एक्स्प्रेस (तीन रेक)
  • गाडी क्रमांक १७६१७/१७६१८ नांदेड – मुंबई तपोवन एक्स्प्रेस आणि गाडी क्रमांक १७६८७/१७६८८ मराठवाडा एक्सप्रेस (तीन रेक)
  • गाडी क्रमांक १७६११/१७६१२ नांदेड – मुंबई राज्यराणी एक्स्प्रेस (दोन रेक)
  • गाडी क्रमांक २२१५५/२२१५६ कोल्हापूर – कलबुर्गी एक्स्प्रेस (एक रेक)
  • गाडी क्रमांक ११००१/११००२ मुंबई – बल्हारशाह नंदीग्राम एक्स्प्रेस (तीन रेक)
  • गाडी क्रमांक ११०२७/११०२८ दादर – सातारा एक्स्प्रेस (पुणे-पंढरपूर मार्गे) आणि गाडी क्रमांक ११०४१/११०४२ दादर – शिर्डी एक्स्प्रेस (पुणे मार्गे) (दोन रेक)
  • गाडी क्रमांक १२१३१/१२१३२ दादर – शिर्डी एक्सप्रेस (मनमाड मार्गे) आणि गाडी क्रमांक २२१४७/२२१४८ दादर – शिर्डी एक्स्प्रेस (मनमाड मार्गे) (एक रेक)
  • गाडी क्रमांक ०११३९/०११४० नागपूर – मडगाव एक्स्प्रेस (एक रेक)
  • गाडी क्रमांक ११४०३/११४०४ कोल्हापूर-नागपूर एक्स्प्रेस (एक रेक)
  • गाडी क्रमांक २२१०७/२२१०८ मुंबई लातूर एक्स्प्रेस (दोन रेक)
  • गाडी क्रमांक १९००३/१९००४ दादर भुसावळ खान्देश एक्स्प्रेस (पाच रेक)
  • गाडी क्रमांक ५९०२३/५९०२४ मुंबई वलसाड फास्ट पॅसेंजर
  • गाडी क्रमांक ११४१३/११४१४ पंढरपूर – निजामाबाद एक्स्प्रेस, गाडी क्रमांक ११४०९/११४१० पुणे – निजामाबाद एक्सप्रेस, गाडी क्रमांक गाडी क्रमांक ५१४०१/५१४०२ पुणे बारामती पॅसेंजर
  • गाडी क्रमांक ११४११/११४१२ परळी – सांगली एक्स्प्रेस