मुंबई : सागरी किनारा मार्गातील (कोस्टल रोड) भुयारात एका वाहनाने अचानक पेट घेतला. ही घटना गुरूवारी सकाळी ९.३० च्या सुमारास घडली. या आगीमुळे भुयारात धूराचे साम्राज्य पसरले होते. सुरक्षेच्या कारणास्तव या मार्गावरील दक्षिण व उत्तर दिशेकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली होती. दीड तासानंतर वाहतूक सुरळीत झाल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले.

मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि प्रवासाचा वेळ वाचवण्यासाठी धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई सागरी किनारा मार्ग बांधण्यात आला आहे. या मार्गातील भुयारात शनिवारी एका वाहनाला अचानक आग लागली.

नेमकी आग कशी लागली ?

मुंबई वाहतूक पोलिसांनी ‘एक्स’ (पू्वीचे ट्विटर) या समाजमाध्यावरून या घटनेची माहिती दिली. ताडदेवजवळील सागरी मार्गाच्या दक्षिणेकडे जाणाऱ्या बोगद्यात एका वाहनाला अचानक आग लागली. या आगीमुळे बोगद्यात धुराचे साम्राज्य पसरला. या आगीतून वाहनचला बचावला आहे.

वाहतूक वळवली

आग लागल्यानंतर लगेचच बोगद्यामधील वाहतूक रोखण्यात आली. त्यामुळे हाजी अली व वरळी कनेक्टर येथे वाहतूक वळवण्यात आली होती. परिणामी, या परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. सुरक्षेच्या कारणास्तव दक्षिण व उत्तर दिशेकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली. आगीमुळे सागरी किनारा मार्गावरील (ताडदेव) दक्षिण व उत्तर दिशेकडील वाहतूक थांबवण्यात आली होते, असे सहपोलीस आयुक्त (वाहतूक) अनिल कुंभारे यांनी सांगितले. तासाभरानंतर येथील वाहतूक सुरळीत करण्यात आली. आग विझवून संबंधित वाहन हटवण्यात आले. आता सागरी किनारा मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.

सागरी मार्गावरील यापूर्वीचे अपघात

  • १४ जून २०२५

आकाश सोनावणे कोल्हापूर येथे अन्न निरीक्षक म्हणून काम करतात. ते शुक्रवार, १४ जून रोजी संध्याकाळी हाजीअली येथून सागरी महामार्गावरून मरीन ड्राईव्हच्या दिशेने निघाले होते. पावसामुळे सागरी महामार्गाच्या भुयारात पाणी साचले होते. सोनावणे यांना तेथे साचलेल्या पाण्याचे छोटे डबके दिसले. त्यांनी अचानक ब्रेक दाबून वाहनाचा वेग कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र साचलेल्या पाण्यामुले त्यांचे वाहन घसरून उलटले आणि भींतीवर आदळले. या अपघातामधून सोनावणे सुखरूप बचावले. वाहतूक पोलिसांनी तात्काळ अपघातग्रस्त वाहन बाजूला केले आणि वाहतूक सुरळीत केली. या अपघाताची चित्रफित समाजमाध्यमावर वायरल झाली होती.

  • २२ सप्टेंबर २०२५

सागरी किनारा मार्गावर (कोस्टल रोड) भरधाव वेगात धावणाऱ्या लॅम्बोर्गिनी या आलिशान गाडीचा ताबा सुटून ती दुभाजकाला धडकली. हा अपघात रविवार, २२ सप्टेंबर रोजी सकाळी दक्षिण दिशेला जाणाऱ्या मार्गावर झाला होता. अपघातामुळे गाडीचा पुढील भाग पूर्णपणे तुटला, मात्र चालकाला कोणतीही दुखापत झाली नाही. उद्योगपती गौतम सिंगानिया यांनी यासंदर्भातील चित्रफित त्यांच्या इन्स्टाग्राम खात्यावर पोस्ट केली होती. याप्रकरणी वरळी पोलिसांनी चालक अतिश शहा (५२) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.