मुंबई : गेले अनेक दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने गुरुवारी मुंबईत दमदार हजेरी लावली. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण होऊन नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. गेल्या दोन – तीन दिवसांपासून काही ठिकाणी रिमझिम पाऊस हजेरी लावत होता. मात्र, मुंबईत फारसा पाऊस नसल्यामुळे उकाड्याने असह्य होत होते. उपनगरांत पावसाचा जोर अधिक होता. दरम्यान, सोमवारी मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला.

मुंबईत सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाचा जोर नव्हता. अधूनमधून हलक्या सरी बरसल्या. दरम्यान, पावसाने ओढ दिल्यामुळे मागील काही दिवस मुंबईकरांना असह्य उकाड्याचा सामना करावा लागत होता. तसेच तापमानातही वाढ झाली होती. मुंबईत सोमवारी कोसळलेल्या पावसामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. याचबरोबर अनेक दिवसांनी पडलेल्या पावसामुळे मुंबईकर सुखावले.

शहरातील भायखळा, दादर, वरळी, परळ, प्रभादेवी तसेच उपनगरातील वांद्रे, अंधेरी, बोरिवली, दहिसर भागात पावसाचा जोर अधिक होता. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे मुंबईकरांची तारांबळ उडाली. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात सोमवारी २७ अंश सेल्सिअस तर, सांताक्रूझ केंद्रात २७.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. सरासरीपेक्षा दोन्ही केंद्रावर ३ अंशाने कमी तापमानाची नोंद झाली.

मागील काही दिवस साधारण तापमानाचा पारा ३० अंशापुढे नोंदला जात होता. याचबरोबर कुलाबा येथे सोमवारी सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत २० मिमी, तर सांताक्रूझ केंद्रात ३ मिमी पावसाची नोंद झाली.

आत्तापर्यंतची पाऊस नोंद

हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात १ जून २२ सप्टेंबरपर्यंत २४३४.८ मिमी, तर सांताक्रूझ येथे ३२८२.१ मिमी पावसाची नोंद झाली. कुलाबा केंद्रात जून ते सप्टेंबर या कालावधीत २०९४.६ मिमी, तर सांताक्रूझ केंद्रात २३१८.८ मिमी पाऊस पडणे अपेक्षित असतो. आत्तापर्यंतची नोंद लक्षात घेता दोन्ही केंद्रावर सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे.

मुंबईत मे महिन्यात सर्वाधिक

यंदा मे महिन्यातच मुंबईत पावसाने दमदार हजेरी लावली होती. १ ते ३१ मे या कालावधीत ८८१.६ मिमी पावसाची नोंद झाली. यंदा हवामानातील बदलांमुळे मुंबई आणि उपनगरांमध्ये मे महिन्यात नेहमीपेक्षा जास्त पडलेला वळवाचा पाऊस आणि त्यानंतर लवकरच दाखल झालेला मोसमी पाऊस यामुळे संपूर्ण मे महिन्यात ८८१.६ मिमी पावसाची नोंद झाली.मे मध्ये हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात ५०३.२ मिमी, तर सांताक्रूझ केंद्रात ३७८.४ मिमी पावसाची नोंद झाली. यापूर्वी १९१८ मध्ये १ ते ३१ मे दरम्यान २७९.४ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर तब्बल १०७ वर्षांनी यंदा मे महिन्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.