सेट टॉप बॉक्स रिचार्चसंबंधी समस्या सोडवण्यासाठी एका महिलेने इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या फोन नंबरवर फोन केला. त्यानंतर ज्या व्यक्तीसोबत तिचं बोलणं झालं त्याने त्या महिलेला तिच्या फोनमध्ये रिमोट अॅक्सेस अ‍ॅप डाऊनलोड करायला लावलं. त्या माध्यमातून त्या सायबर गुन्हेगाराने तिच्या बँक खात्यातून ८१,००० रुपये काढून घेतले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विक्रोळी पूर्वेकडील कन्नमवार नगर येथील रहिवासी असलेल्या ४७ वर्षीय तक्रारदार महिलेने ५ मार्च रोजी सेट टॉप बॉक्स रिचार्ज केला. त्यासाठी तिने ९३१ रुपये भरले. परंतु या महिलेला पैसे जमा झाल्याचे दिसले नाही, किंवा त्यासंबंधी कोणताही मेसेज आला नाही. त्यानंतर तिने एक दिवस वाट पाहिली आणि दुसऱ्या दिवशी तिने कस्टमर केअरला कॉल करायचे ठरवले. त्यासाठी तिने इंटरनेटवर नंबर शोधला.

इंटरनेटवर या महिलेला एक हेल्पलाईन नंबर मिळाला. तिने त्या नंबरवर कॉल केला. परंतु तिचा कस्टमर केअर कर्मचाऱ्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यानंतर तिने फोन ठेवला. काही वेळाने तिला एका अनोळखी नंबरवरून फोन आला आणि त्या व्यक्तीने सांगितले की, तो कस्टमर केअरमधून बोलतोय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रिमोट अ‍ॅक्सेस अ‍ॅप्लिकेशनद्वारे फसवणूक

सदर महिलेने त्या फ्रॉड कस्टमर केअर कर्मचाऱ्याला तिची समस्या सांगितली. त्यानंतर त्याने तिला फोनवर रिमोट अ‍ॅक्सेस अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करायला सांगितले. त्याने सांगितलेल्या प्रत्येक सूचनेचं तिनं पालन केलं. त्यानंतर तिला एक ओटीपी आला. पलिकडून बोलणाऱ्या व्यक्तीने तिला ओटीपी मागितला. तिने कोणतेही आढेवेढे न घेता त्याला ओटीपी दिला. त्यानंतर काहीच सेकंदात तिला तिच्या बँक खात्यामधून पैसे डेबिट झाल्याचा मेसेज आला.

हे ही वाचा >> “विरोधकांना बोलायला जागाच ठेवली नाही”; उद्धव ठाकरेंच्या टीकेला एकनाथ शिंदेंचं उत्तर

बँक खात्यातून पैसे वजा झाल्याचा मेसेज आल्यानंतर त्या महिलेच्या लक्षात आलं की, तिची फसवणूक झाली आहे. त्यानंतर तिने पोलिसात धाव घेतली. मंगळवारी या महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.